नागपूर - पेट्रोल आणि डिझेलचे दर सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर गेले आहेत. देशात दिवसा-गणिक महागाई वाढत आहे. तरी केंद्र सरकार सर्वसामान्यांना कोणताही दिलासा देण्याची तसदी घेत नसल्याने आज वाढत्या महागाईच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी नागपूरच्या शंकरनगर चौकात भोंगा आंदोलन केले आहे. राष्ट्रवादीचे महासचिव प्रवीण कुंटे पाटील आणि प्रशांत पवार यांच्या नेतृत्वात भोंगा आंदोलन करण्यात आले आहे.
हेही वाचा - Raj Thackeray's Tweet : महाराष्ट्रात 'योगी' कुणीच नाही, आहेत ते फक्त सत्तेचे 'भोगी'- राज ठाकरे
महागाईची दवंडी - सध्या राज्यात भोंगा केंद्रित राजकारण सुरू असल्याने राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी भोंगावरून महागाईची दवंडी पिटली आहे. यावेळी आंदोलकांनी 2014 च्या निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकांना दिलेल्या आश्वासनांची आठवण भोंग्यावरून करून दिली. या आंदोलनात शहरातील मोजकेच नेते आणि कार्यकर्ते सहभागी झाले होते. गेल्या काही महिन्यात पेट्रोल डिझेल आणि घरगुती वापरातील गॅस सिलेंडरचे दर हे सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर गेले आहे मात्र या मूळ मुद्द्यावरून नागरिकांचे लक्ष विचलित करण्याकरिताच भोंग्याचा राजकारण केले जात असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी केला आहे.