नागपूर - केंद्रीय तपास यंत्रणा आज कुणाच्या मागे लागणार आहेत, कुणाच्या तपासात काय- काय आढळले ही गोपनीय माहिती केवळ भाजपच्या (BJP) नेत्यांनाच कशी समजते? असा प्रश्न काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी उपस्थित केला आहे. एकूणच हा संपूर्ण प्रकार संशयास्पद वाटत असल्याचे देखील नाना पटोले म्हणाले. ते सोमवारी नागपूर विमानतळावर पत्रकारांसोबत बोलत होते.
मुंबई महानगरपालिकेचे स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव सध्या केंद्रीय तपास यंत्रणांच्या रडारवर आहेत. जाधव यांच्याकडून जप्त करण्यात आलेल्या डायरीमध्ये मातोश्री संदर्भात काही माहिती आढळून आली असल्याचे बोलले जात आहे. यावर नाना पटोले यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मातोश्री आणि महाविकास आघाडीला बदनाम करण्याचे भाजप षडयंत्र रचत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. मात्र, भाजपच्या या खेळात आता लोकांना रस उरलेला नाही, त्यामुळे इथून पुढे महाराष्ट्र पुढे कसा जाईल याचाच विचार भाजपने करावा, असा सल्ला देखील नाना पटोले यांनी भाजपच्या नेत्यांना दिला आहे.
भविष्यात काँग्रेस एक नंबरचा पक्ष - 2024 च्या निवडणुकीच्या अनुषंगाने भाजप नेत्यांकडून अनेक दावे केले जात आहेत. मात्र, त्यात किती तथ्य आहे यावर आता काही सांगता येणे शक्य नाही. परंतु, जी स्थिती आज दिसत आहे त्यावरून पुढच्या काळात काँग्रेसच नंबर एकचा पक्ष म्हणून पुढे येईल, असा दावा नाना पटोले यांनी केला आहे. काँग्रेसजवळ इतिहास आणि भूगोल दोन्ही आहे हे येणारा काळच सांगेल, असे नाना म्हणाले. काँग्रेस पक्ष हा लोकशाहीला मानणारा आहे. मात्र, भाजप म्हणजे लोकशाहीला न समजणारी व्यवस्था झाली असल्याची टीका नाना पटोले यांनी केली आहे.
चंद्रकांत पाटील यांना टोला - राज्यात महाविकास आघाडीच्या सरकारचे स्टेअरिंग कुणाकडे आहे? सरकार कोण चालवत यात विरोधकांना लक्ष घालण्याची काय गरज आहे? असा प्रश्न नाना पटोले यांनी उपस्थित केला आहे. पहाटेचे सरकार पडल्यापासूनचं भाजप नेते चंद्रकांत पाटील यांची तडफड बघायला मिळत असल्याचा टोला नाना पटोले यांनी चंद्रकांत पाटील यांना लगावला आहे.
आम्हाला घर नको, काँग्रेस आमदारांची भूमिका - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी 300 आमदारांना मुंबईत घर देण्याची घोषणा केली आहे. यावर राज्यात नाराजीचा सूर उमटत आहे. या संदर्भात नाना पटोले यांना विचारले असता ते म्हणाले की, काँग्रेसच्या अनेक आमदारांनी लिहून दिले आहे की आम्हाला घर नको.