नागपूर - शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या तोतलडोह धरणाच्या जलसाठ्यात झपाट्याने वाढ होते आहे. त्यामुळे नागपूरकरांवरील पाणी कपातीचे संकट लवकरच दूर होण्याची शक्यता आहे. नागपुरकरांसाठी ही आनंदाची बातमी आहे.
तोतलाडोह धरणात 32 टक्के पाणीसाठा जमा झाला आहे. १८ दिवसांपूर्वी याच तोतलाडोह धरणाने पावसाअभावी तळ गाठला होता. गेल्या काही दिवसांपासून मध्यप्रदेशच्या छिंदवाडा येथे चांगला पाऊस झाला. त्यामुळे चौराई धरण पूर्ण भरले. या धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आल्याने तोतलाडोह धरणातील पाणीसाठा वाढला आहे.
धरणात पाणीसाठा वाढला असल्याने नागपुरकरांवरील जलसंकट दूर होणार असल्याची शक्यता वाढली आहे. तत्पुर्वी नागपूर महानगरपालिकेच्या पाणी पुरवठा विभागाने या महिन्याच्या 31 तारखेपर्यंत एकदिवसाआड पाणी पुरवठा करण्याचा निर्णय घेतला होता.