नागपूर - गुन्हेगारांचे नंदनवन समजले जाणाऱ्या नागपुरात महिला सुरक्षेचा प्रश्न कायम आव वासून उभा आहे. महिलांना सुरक्षित वातावरण मिळावे यासाठी नागपूरच्या वाहतूक विभागाने एक उपाय काढण्याचा प्रयत्न केला आहे. महिलांचा प्रवास सुखकर आणि भयमुक्त वातावरणात व्हावा यासाठी शहरात धावणाऱ्या प्रत्येक ऑटोरिक्षावर वाहतूक पोलिसांनी क्यूआर कोड लावण्यास सुरवात केली आहे. या क्यूआर कोडच्या माध्यमातून ऑटो चालकाची संपूर्ण माहिती प्रवाशांना उपलब्ध होणार आहे. शिवाय ही माहिती कुटुंबातील सदस्यांना देखील पाठवता येणार असल्याने अनेक पालकांची चिंता कमी होणार आहे.
ऑटोमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना खासकरून महिला, मुली आणि वृद्ध नागरिकांना सुरक्षित वाटावे यासाठी नागपूर पोलिसांच्या वाहतूक शाखेने खास मोहीम हाती घेतली असल्याची माहिती वाहतूक विभागाचे उपायुक्त विक्रम साळी यांनी दिली. नागपुरात गेल्या काही काही महिन्यांमध्ये महिलांसंबधित गुन्हेगारीच्या अनेक घटना घडल्या आहेत. त्यामुळे महिला आणि ज्येष्ठ नागरिकांच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. त्या पार्श्वभूमीवर पोलिसांचा हा प्रयत्न भविष्यातील गुन्हेगारी घटना कमी करण्यात मदत मिळणार आहे.
शहरात ऑटोमध्ये प्रवास करणाऱ्या प्रवाशांसोबत सातत्याने लुटीच्या घटना घडत आहेत. त्यामुळे नागपूर पोलिसांच्या वाहतूक शाखेने शहरातील प्रत्येक ऑटोमध्ये क्यूआर कोड प्रणाली लागू केली आहे. याअंतर्गत प्रत्येक ऑटोमध्ये चालकाच्या सीटच्या मागे एक क्यूआर कोड लावण्यात आला आहे. प्रवाशांनी ऑटोमध्ये बसल्यानंतर कोणत्याही क्यूआर कोड स्कॅनर अॅपने स्कॅन केल्यानंतर त्या ऑटो चालकाचे नाव, त्याचा फोटो, ऑटोचा क्रमांक आणि इतर आवश्यक माहिती प्रवाशाला फोनवर उपलब्ध होणार आहे. गरज भासल्यास प्रवाशाला ती माहिती कुटुंबियांना पाठवून तो कोणत्या ऑटोमध्ये कुठून-कुठे प्रवास करत आहे, याचीही माहिती देता येणार आहे. यामुळे ऑटोमधून रात्री-अपरात्री प्रवास करणाऱ्या महिला आणि ज्येष्ठ नागरिकांचा प्रवास जास्त सुरक्षित होण्याची हमी मिळणार आहे.
पहिल्या टप्प्यात शहरातील दोन हजार ऑटोंमध्ये ही प्रणाली लागू केली जात असून वाहतूक शाखेच्या विविध कार्यालयांमध्ये हे क्यूआर कोड लावण्याचे काम आजपासून सुरू करण्यात आले आहे. या प्रणालीमुळे प्रवाशांशी नीट न वागणारे, लुट करणारे आणि अशोभनीय वर्तन करणाऱ्या ऑटो चालकांना शोधणे पोलिसांना शक्य होणार आहे. शिवाय प्रवाशांचे काही साहित्य ऑटोमध्ये विसरल्यास पुन्हा त्या ऑटो चालकाला शोधणे ही सहज शक्य होणार आहे. त्यामुळे पोलीस, ऑटो चालक आणि प्रवाशी सर्वांसाठी ही प्रणाली मदतीची ठरणार आहे.