नागपूर - महामेट्रोचा विस्तार आता मुख्य शहराजवळील अन्य ठिकाणांना जोडण्यासाठी होणार आहे. पॅसेंजर ट्रेनऐवजी वातानुकुलीत मेट्रोने हे काम साध्य करण्याचा महाविकास आघाडीचा मानस आहे. यासाठी नागपूर ते नरखेड मेट्रो प्रकल्पाला राज्य मंत्रिमंडळाने आज मंजूरी दिली आहे.
नागपूरपासून जवळ असलेल्या नरखेडसह भंडारा, वर्धा व रामटेक ही शहरे देखील मेट्रोने जोडली जाणार आहेत. नागपूर ते नरखेड या ८५.५३ किलोमीटर मार्गाचा यात समावेश आहे. या शहरांदरम्यान ११ स्थानके असणार आहेत. नागपूर शहरातून होणाऱ्या वाहतुकीचा ताण कमी करण्यासाठी ब्रॉड गेज मेट्रो सुरू करण्याच्या संदर्भात २०१८ मध्ये एक सामंजस्य करार करण्यात आला होता. परंतु या करारात अनेक त्रुटी होत्या. तसेच केंद्र सरकारच्या संदर्भात असलेल्या या प्रकल्पासाठी राज्य मंत्रिमंडळाची परवानगीही तत्कालीन सरकारने घेतली नव्हती. या प्रकल्पाला आज राज्य मंत्रिमंडळाची रितसर मंजुरी मिळाल्याने या प्रकल्पाचा मार्ग मोकळा झाला आहे.
महाराष्ट्र सरकार, केंद्र सरकार महामेट्रोचे भागभांडवल या प्रकल्पामध्ये असणार आहे. यासाठी केएफडब्ल्यू या संस्थेकडून कर्ज घेण्याची जबाबदारी व त्या संदर्भात पत्रव्यवहार करण्याची जबाबदारी महामेट्रोवर टाकण्यात आली आहे. नरखेड, वर्धा, रामटेक व भंडारा या शहरातून येणारे व जाणारे अनेक प्रवासी असतात. याचा फायदा नागपूर शहरातील मेट्रोच्या प्रवाशी संख्या वाढण्यासाठी देखील होणार आहे. हा प्रकल्प दोन टप्प्यात पूर्ण होणार आहे. यातील पहिला टप्पा २०२१ ते २०३१ या काळात पूर्ण होणार आहे.
तर दुसरा टप्पा २०३१ नंतर सुरू होणार आहे. यात नागपूर ते नरखेड हा ८५.५३ किमी, नागपूर-वर्धा ७८.८ किमी, नागपूर-रामटेक ४१.६ व नागपूर-भंडारा रोड हा ६२.७ किलोमीटर रेल्वे मार्गाचा समावेश राहणार आहे. नागपूरच्या जवळच्या शहरातून ये-जा करणाऱ्यांची संख्या वाढणार असल्याने लोकांना सोयीस्कर होणार आहे.
महामेट्रो प्रकल्पाला नरखेड जोडले जाणार असल्याने नरखेड व काटोल या परिसरातील विकासाला चालना मिळेल, असा विश्वास राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी व्यक्त केला. गेल्या अनेक वर्षांपासून मेट्रोने काही शहरं जोडावी, अशी मागणी जोर धरत होती. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे या संदर्भात पाठपुरावा करण्यात आला होता. अखेर आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा प्रस्ताव मान्य झाला आहे. या प्रकल्पामुळे विकासाची नवी दिशा मिळणार असल्याचे देशमुख म्हणाले.