नागपूर - वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या फॅन्सी नंबर प्लेट वाहनधारकांचे प्रमाण वाढत आहे. याच पार्श्वभूमीवर नागपुरात वाहतूक पोलीस विभागाकडून विशेष कारवाईला सुरूवात करण्यात आली आहे. वाहतूक नियमांना धाब्यावर बसवत वाहनांच्या नंबर प्लेटवर फॅन्सी नंबर लावणाऱ्यांवर ही कारवाई करण्यात येत आहे. शहरातील लॉ कॉलेज चौकसह सर्वच ठिकाणी ही विशेष मोहिम राबविली जात आहे. शिवाय अतिरेक करणाऱ्या वाहनधारकांच्या गाड्याही जप्त केल्या जात आहे. पुढील तीन दिवस ही कारवाई सुरू राहणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
रस्त्यावर अनेक फॅन्सी नंबर प्लेट असणारी वाहने पाहयला मिळतात. वाहतूक विभागाच्या नियमांचे उल्लंघन करून अशा नंबर प्लेट दिसून येतात. याच विरोधात आता नागपूर वाहतूक शाखेकडून कारवाईला सुरूवात करण्यात आली आहे. फॅन्सी नंबर प्लेट लावून गाड्या फिरवणाऱ्यांवर ही कारवाई करण्यात येत आहे. अशा वाहनधारकांना वाहतूक विभागाकडून चांगलाच चोप दिला जात आहे. शिवाय अनेक वाहनधारकांचे वाहन जप्ती देखील करण्यात येत आहे. शहरात वाहतूक नियमांचे वाढते उल्लंघन पाहता ही विशेष मोहिम सुरू करण्यात आली आहे. पहिल्याच दिवशी शहरातील एकूण १००० पेक्षा अधिक फॅन्सी नंबर प्लेट वाहनधारकांवर ही कारवाई करण्यात आली आहे. शिवाय ही मोहिम पुढील तीन दिवस सुरू राहणार असल्याची प्रतिक्रिया पोलीस निरिक्षक पराग पोटे यांनी दिली आहे.
या मोहिमे अंतर्गत या पूर्वी सुद्धा ज्या वाहनधारकांवर ही कारवाई करण्यात आली आहे. मात्र, त्यांनी अद्यापही नंबर प्लेट बदलले नाही. अशा वाहनधारकांच्या गाड्या वाहतूक पोलिसांकडून जप्तही केल्या जात आहे. त्याचबरोबर जोपर्यंत अपेक्षित नंबर प्लेट बसवणार नाही तो पर्यंत गाड्या जप्तच राहणार, असेही यावेळी पोलिसांकडून सांगण्यात आले. त्यामुळे पुढील तीन दिवसात किती लोकांवर ही कारवाई होईल हे पाहणे महत्वाचे असणार आहे.