नागपूर - नागपूर शहरातील यशोधरा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अशोक मेश्राम यांच्यावर अखेर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. कर्तव्यावर असलेल्या होमगार्ड महिलेशी अश्लील वर्तन केल्याप्रकरणी पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी तात्काळ कारवाई केली असून, त्यांनी पोलीस निरीक्षक अशोक मेश्रामांच्या निलंबनाचे आदेश दिले आहेत.
ही घटना दोन दिवसांपूर्वी घडली होती. पोलीस निरीक्षक अशोक मेश्राम यांनी यशोधरा नगर पोलीस ठाण्यात होमगार्ड असलेल्या २४ वर्षे तरुणीचा विनयभंग केला. पीडीत महिलेने तिच्यासोबत वरिष्ठ अधिकाऱ्याने केलेल्या अश्लील वर्तनाची तक्रार केली. या घटनेची गंभीर दखल घेत पोलीस आयुक्तांनी निरीक्षक अशोक मेश्राम यांना निलंबित केले आहे. यशोधरा नगर पोलीस स्टेशनमध्येच त्यांच्या विरोधात विनयभंगाचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
काय आहे प्रकरण ?
दोन दिवसांपूर्वी पीडित महिला होमगार्ड तरुणी कर्तव्यावर असताना अशोक मेश्राम यांनी तिला कॅबिनमध्ये बोलावून घेतले आणि त्या महिलेला "तुला पीएसआय बनण्यास मदत करतो" असे आमिष दाखवून तिच्याशी जवळीक साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, पीडित तरुणी प्रतिसाद देत नव्हती. त्यामुळे रागावलेल्या मेश्राम यांनी स्वतःच्या वर्दीतली फीत नीट करण्याच्या उद्देशाने, तिच्याशी अश्लील वर्तन केले. अनपेक्षित घडलेल्या या घटनेमुळे होमगार्ड महिला प्रचंड घाबरली. मेश्राम यांच्या कॅबिनमधून ती रडतच बाहेर आली.
विशाखा समितीच्या चौकशीत तथ्य उघड
या प्रकरणाची पोलीस दलात चर्चा सुरू झाल्यानंतर पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनाही ही घटना समजली. पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी विशाखा समितीच्या अध्यक्ष डीसीपी विनिता शाहू यांना प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले. विशाखा समितीच्या चौकशीत अशोक मेश्राम यांच्या विरोधात पीडित होमगार्ड तरुणीसह इतर महिला कर्मचाऱ्यांनी वाईट वागणुकीची तक्रार केली. त्यानंतर पोलीस निरीक्षक अशोक मेश्राम यांना निलंबित केले. आणि त्यांच्या विरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्याचे निर्देश दिले.
हेही वाचा - कोकण रेल्वे मार्गावर मोठा दगड कोसळल्याने राजधानी एक्सप्रेसला अपघात, प्रवासी सुखरुप