नागपूर - केवळ काही तासाच्या अंतरात नागपूर शहराचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी शहरातील तीन विविध पोलिस ठाण्यात कार्यरत असलेल्या सहा अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना विविध कारणांनी निलंबित केले आहे. ही माहिती पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे.
मानकापूर पोलीस ठाण्यातील चार कर्मचाऱ्यांना कर्तव्यात कचुराई केल्यामुळे निलंबित करण्यात आले आहे. तर गिट्टीखदान पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक यांना महिलेला लग्नाचे आमिष दाखवून लैंगिक शोषण केल्याप्रकरणी निलंबित करण्यात आले आहे. बालकल्याण प्रकल्प अधिकारी आत्महत्या प्रकरणात ठाणे पोलिसांनी यशोधरा पोलीस ठाण्यातील पोलीस निरीक्षकाला अटक केल्याने निलंबित करण्यात आल्याची माहिती पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी दिली आहे. अवघ्या काही तासात शहरातील तीन वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या तीन पोलीस उपनिरीक्षकासह तीन पोलीस कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. या कारवाईने शहर पोलीस दलात खळबळ उडाली आहे.
हेही वाचा-...तर ताकदीने बेळगावात उतरावे लागेल, संजय राऊत यांचा इशारा
पहिली घटना
पहिली घटना ही शहरातील मानकापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली. एका ज्येष्ठ नागरिकांच्या मृत्यूप्रकरणी पोलिस कर्मचाऱ्यांनी दाखवलेल्या निष्काळजीपणामुळे पोलीस आयुक्तांनी माणकापुर पोलीस ठाण्यातील चौघांना निलंबित केले आहे. निलंबितांमध्ये पोलीस उपनिरीक्षकासह तीन कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. पोलीस उपनिरीक्षक लाकडे, कर्मचारी रोशन यादव, राहुल बोटरे आणि संजय पांडे अशी निलंबित करण्यात आलेल्या पोलिसांचा समावेश आहे.
नागपूरच्या लोखंडे नगर परिसरात राहणारे भैयालाल बैस हे 64 वर्षीय वृद्ध 8 मार्चला बेपत्ता झाले होते. दरम्यान 9 मार्च रोजी ते जखमी अवस्थेत गोरेवाडा परिसरात आढळून आले. यासंदर्भात नागरिकांनी पोलिसांना माहिती दिली. मात्र, पोलीस कर्मचारी आणि अधिकारी अनेक तास घटनास्थळी आलेच नाही. त्यामुळे भैयालाल बैस यांचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी माणकापुर पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हादेखील नोंद करण्यात आलेला आहे. कारण भैय्यालाल बळी त्यांच्या मृतदेहावर अनेक जखमा आढळून आल्या होत्या. सूचना मिळाल्यानंतरदेखील पोलिस ठाण्याचे कर्मचारी आणि अधिकारी घटनास्थळी गेले नाहीत. त्यामुळे भैयालाल बैस यांचा मृत्यू झाल्याचा ठपका दोषी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना ठेवण्यात आला. त्यानुसार आज पोलीस आयुक्तांनी पोलीस उपनिरीक्षक असे चार कर्मचाऱ्यांना निलंबित केले आहे.
हेही वाचा-वीज बिल माफीसाठी 19 मार्चला राज्यभर महामार्ग रोको आंदोलन; राजू शेट्टींची माहिती
दुसरी घटना-
दुसरी घटना ही शहरातील गिट्टीखदान पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे. पोलीस मुख्यालयात कार्यरत असलेले पोलीस निरीक्षक अरविंद भोळे यांनी महिलेला प्रेमाच्या जाळ्यात ओढल्यानंतर पीडित महिलेला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यासोबत शारीरिक संबंध प्रस्थापित केले. दरम्यान भोळे यांनी त्या महिलेला टाळायला सुरुवात केली. त्या महिलेने भोळे यांना संपर्क करण्याचे अनेक प्रयत्न केल्यानंतरसुद्धा ते प्रतिसाद देत नव्हते. त्या महिलेने थेट गिट्टीखदान पोलीस ठाण्यात जाऊन त्यांच्या विरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. गुन्हा दाखल होताच पोलीस आयुक्तांनी पोलीस निरीक्षकाला निलंबित केले आहे.
हेही वाचा-सचिन वझेंच्या 'त्या' व्हाटसअॅप स्टेटस संदर्भात माहिती घेऊन बोलतो - गृहमंत्री अनिल देशमुख
तिसरी घटना -
तिसरी घटना ही ठाणे पोलीस आयुक्तालयाचा हद्दीत घडली आहे. बालकल्याण प्रकल्प अधिकारी सचिन साबळे यांना आत्महत्येला प्रवत्त केल्याप्रकरणी यशोधरा पोलीस ठाण्यातील तीन अधिकाऱ्यांसह सहा जणांविरुद्ध अंबरनाथ पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. सचिन साबळे हे मुंबईतील गोरेगाव येथे बालविकास प्रकल्प अधिकारी म्हणून कार्यरत होते. त्यांनी १८ फेब्रुवारीला आत्महत्या केली होती. घटनास्थळी पोलिसांना मृत सचिन साबळे यांची एक डायरी मिळून आली होती. त्याआधारे अंबरनाथ पोलिसांनी पोलीस उपनिरीक्षक दीपक चव्हाण यांना ताब्यात घेतले आहे. त्यामुळे नागपूर शहराचे पोलीस आयुक्त अमितेशकुमार कुमार यांनी त्यांना निलंबित केले आहे.