नागपूर - महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी रुग्णांकडून जास्तीचे पैसे वसूल करणाऱ्या सेवन स्टार रुग्णालयाला रुग्णांचे ६ लाख ८६ हजार रुपये परत करण्याचा आदेश देत पाच लाखांचा दंड लावला आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे गेल्या चार दिवसात मुंढे यांनी सेवन स्टार रुग्णालयावर दुसऱ्यांदा कारवाई केली आहे. त्यामुळे रुग्णांच्या पैशाची लूट करणाऱ्या रुग्णालयांचे धाबे दणाणले आहे.
कोरोना रुग्णांवर उपचार करताना अव्वाच्या सव्वा बिल आकारणाऱ्या रुग्णालयांवर नागपूर महानगर पालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी कारवाईचा धडाका लावला आहे. चार दिवसांपूर्वी शहरातील प्रसिद्ध हॉस्पिटल वॉकहार्ट आणि सेवन स्टार हॉस्पिटला नोटीस बजावली होती. ज्यामध्ये रुग्णांकडून घेतलेले जास्तीचे साडेदहा लाख रुपये पैसे परत करण्याचा आदेश दिला होता. त्यानंतर वॉकहार्ट हॉस्पिटलने संबंधित रुग्णांना ९ लाख ५० हजार परत केले होते, तर सेवन स्टार हॉस्पिटलला एक लाख रुपये परत करावे लागले होते. मात्र, आज आयुक्त तुकाराम मुंढे यांनी पुन्हा सेवन स्टार हॉस्पिटलवर कारवाई केली आहे, यावेळी मुंढे यांनी महामारी कायदा, आपत्ती व्यवस्थापन आवश्यक सेवा कायदा मुंबई नर्सिंग होम कायद्यांतर्गत हॉस्पिटलला रुग्णांचे ६ लाख ८६ हजार रुपये परत करण्याचे निर्देश देत ५ लाखांचा दंड देखील लावला आहे.
महापालिकेकडून अतिरिक्त आयुक्त जलज शर्मा यांच्या नेतृत्वात एक पथक तयार आले आहे. पथकाकडून गेल्या काही दिवसांपूर्वी वोक्हार्ट पाठोपाठ सेव्हन स्टार हॉस्पिटलची आकस्मिक पाहणी केली होती. त्यावेळी येथील रेकॉर्ड तपासण्यात आले. यातून सेव्हन स्टार हॉस्पिटलकडून शासन व महापालिकेच्या नियमाचे उल्लंघन केले जात असल्याचे पुढे आले होते.