नागपूर: नागपूर जिल्हा बाल संरक्षण समितीला पुन्हा एका अल्पवयीन मुलीचं लग्न रोखण्यात यश मिळाले आहे. नागपूर शहरातील जरीपटका भागात राहणाऱ्या एका १६ वर्षीय मुलीचं लग्न मध्यप्रदेशच्या एका तरुणा नियोजित होते. मात्र यासंदर्भात माहिती समजताच जिल्हा बाल संरक्षण समितीने लग्नाच्या एक दिवस आधीच वधूच्या घरी जाऊन बालविवाह रोखला आहे.
या प्रकरणातील पीडित मुलीचे वय केवळ 16 वर्ष आहे. तिने नुकतीचं १० वीची परीक्षा दिली आहे. पीडित मुलीचे आई वडील विभक्त झाले असल्याने तिच्या आजी आजोबांनी परस्पर तिच्या लग्नाचा बेत आखला होता. या संदर्भात नागपूर जिल्हा बाल संरक्षण समितीला गोपनीय माहिती समजली होती. त्याआधारे पथकाने लग्नाच्या एकदिवस आधी धाड टाकून लग्नाचा बेत उधळून लावला आहे.
कायदेशीर कारवाई होणार - पीडित मुलीचे वय केवळ 16 वर्ष असल्याने लग्न लावून देण्याचा प्रयत्न करणाऱ्या पीडित मुलीच्या आई-आजोबांवर बालविवाह प्रतिबंधक कायदा २००६ अंतर्गत दंडात्मक कारवाई होण्याची शक्यता आहे. यासंदर्भातील सूचना संबंधितांना देण्यात आल्या आहेत.