नागपूर - दीक्षाभूमी हे बौद्ध बांधवांचे सर्वात महत्वाचे आस्था केंद्र आहे. दीक्षाभूमी ही ऐतिहासिक वास्तू महाराष्ट्राची उपराजधानी नागपूर शहरात स्थापित आहे. १४ ऑक्टोबर १९५६ साली डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दीक्षाभूमीच्या मैदानावर बौद्ध धम्माची दीक्षा घेतली होती, तो दिवस होता विजयादशमीचा. त्यामुळे या भूमीचे नाव दीक्षाभूमी असे झाले. २००१ साली त्याठिकाणी भव्य स्तूपचे निर्माण करण्यात आले आहे. महाराष्ट्र शासनाकडून दीक्षाभूमीला 'अ' वर्ग पर्यटन स्थळ घोषित करण्यात आले आहे. दरवर्षी विजयादशमीच्या दिवशी देशाच्या कानाकोपऱ्यातुन आंबेडकर अनुयायी दीक्षाभूमीवर मोठ्या संख्येने येत असतात.
बुद्ध विहारातून प्राचीन विद्यापीठांची स्थापना -
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लोकशाही आणि मानवतावादी मूल्यांवर आधारित बुद्ध धम्माचा स्वीकार केला. बुद्ध धम्म भारतीय धम्म आहे. बौद्ध काळातच भारत देशाचा सर्वांगीण विकास झाला होता, बौद्ध काळातच बुद्ध विहारातून तक्षशीला, नालंदा, विक्रमशिला, नागार्जुन इत्यादी विद्यापीठे निर्माण झाली होती.
दीक्षाभूमीचा इतिहास -
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी श्रेष्ठ अशा मानवतावादी बुद्ध धम्माची दीक्षा १४ ऑक्टोबर १९५६ रोजी घेतली. ज्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दीक्षा घेतली होती, त्या जागेवर सुरुवातीला बाबासाहेबांचा पुतळा उभारण्यात आला होता. मात्र ती जागा बाबासाहेबांच्या स्पर्शाने पवित्र झाली असल्याची भावना आंबेडकर अनुयायांची असल्याने ती जागा स्मारकासाठी देण्यात यावी, अशी मागणी सातत्याने करण्यात येत होती. महाराष्ट्र शासनाने जनभावनेचा आदर राखत दीक्षाभूमीची १४ एकर जागा डॉक्टर आंबेडकर स्मारक समितीला दिली. त्यानंतर १९७८ साली बांधकामाला सुरुवात करण्यात आली होती, मात्र संपूर्ण बांधकाम २००१ साली पूर्ण करण्यात आले.
दीक्षाभूमीवरील स्तूप प्राचीन सोपान पेक्षा वेगळा -
दीक्षाभूमीवर मोठ्या स्तुपाची निर्मिती करण्यात आली आहे. दीक्षाभूमीवरील स्तूप हे प्राचीन सोपान पेक्षा वेगळे आहे. प्राचीन काळात सम्राट अशोकांनी बुद्धांच्या शरीर धातूवर अनेक स्तूप बांधले होते. ते सर्व स्तूप भरीव स्वरूपातील होते, मात्र दीक्षाभूमीवर असलेले स्तूप हे आतून पोकळ आहे. स्तूपाच्या खालच्या भागात डॉक्टर आंबेडकर यांचा अस्थिकलश ठेवण्यात आला आहे, तर बाजूला गौतम बुद्धांची मोठी मूर्ती आहे. त्याच्या शेजारी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जीवन प्रवास दाखवणारे चित्र प्रदर्शन आहे. स्तूपाच्या वरच्या भागात पाच हजार लोकांच्या बसण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. अशा प्रकारची संरचना करण्यात आली आहे. धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या निमित्ताने दरवर्षी देश-विदेशातून लाखो लोक येतात. दीक्षाभूमीवर येणारे लोक हे पुस्तक खरेदी करून बाबासाहेबांच्या विचारांने प्रेरित होत असल्याचं चित्र दरवर्षी नागपूरमध्ये बघायला मिळते.