नागपूर - दोन दिवसांपूर्वी नागपूर शहरातील ओम नगर येथे राणे कुटुंबातील चौघांचे मृतदेह आढळून आले होते. उच्चशिक्षित असलेल्या राणे दाम्पत्यासह त्यांच्या दोन मुलांचा मृत्यू झाला होता. या घटनेनंतर कोराडी पोलिसांनी तपासाला सुरूवात केली. मात्र, ते अद्यापही हे प्रकरण खून की आत्महत्या, या अंतिम निष्कर्षापर्यंत पोहचू शकलेले नाहीत.
पोलिसांना घटनास्थळी एक सुसाईड नोट आढळून आली होती. ज्यामध्ये डॉ. सुषमा यांनी धीरजला होत असलेला मानसिक त्रास बघवत नसल्याने नमूद केले होते. पोलिसांची चार पथके या प्रकरणी आत्महत्या की खून याचा तपास करण्याचा प्रयत्न करत आहेत. प्राध्यापक धीरज राणे यांना कुणीतरी ब्लॅकमेल करत असावे, असा संशय पोलिसांना असून त्या अनुषंगाने देखील तपास केला जातो आहे.
हेही वाचा - सामूहिक आत्महत्येने नागपूर हादरले.. दोन चिमुकल्यांसह पती-पत्नीने संपवले जीवन
या प्रकरणाच्या तपासादरम्यान काही धक्कादायक सत्य समोर आले आहे. ज्यामध्ये डॉक्टर सुषमा यांनी पती धीरज आणि दोन मुलांचा खून केल्यानंतर स्वतः देखील आत्महत्या केल्याचे बोलले जात आहे. सोमवारी रात्री पती धीरज, मुलगा ध्रुव आणि मुलगी वण्या यांना जेवणातून गुंगीचे औषध दिले. तिघेही बेशुद्ध झाले. त्यानंतर इंजेक्शनचा हेवी डोज देऊन तिघांना ठार मारले असावे, असा कयास लावला जात आहे. कारण घटना उघडकीस येण्याच्या काही तासापूर्वी डॉक्टर सुषमा यांनी त्यांच्या आत्यासासू यांसोबत संवाद साधला होता.
तिघांचा खून केल्यानंतर त्या रात्रभर तिघांच्या मृतदेहाजवळ बसून होत्या. मंगळवारी सकाळी सुषमा बाहेर गेल्या. त्यांनी पांढऱ्या रंगाची फुले विकत आणली. ती फुले तिघांच्या मृतदेहांवर वाहिल्यानंतर स्वतः देखील गळफास घेतला. राणे दाम्पत्य गेल्या एक महिन्यापासून तणावात होते. यातूनच सुषमा यांनी टोकाचे पाऊल उचलल्याचे बोलले जात आहे.
पोलिसांच्या एका पथकाने सुषमा ज्या खासगी रुग्णालयात कार्यरत होत्या. त्या ठिकाणी जाऊन चौकशी केली आहे. तर, दुसऱ्या पथकाने प्राध्यापक धीरज राणे यांच्या कॉलेजमध्ये जाऊन चौकशी सुरू केल्याची माहिती पुढे आली आहे. धीरज यांना कोणीतरी ब्लॅकमेल करत होते का, या दिशेने देखील तपास सुरू केला आहे.