नागपूर - शहरातील वाढती गुन्हेगारी आणि गुन्हेगार पोलीस विभागासाठी नेहमीच डोकेदुखी ठरले आहेत. दिवसागणिक वाढत असलेल्या गुन्हेगारी घटना नियंत्रणात आणण्यासाठी निर्ढावलेल्या गुन्हेगारांना वठणीवर आणणे गरजे होते. त्यासाठी पोलिसांची संबंधित ब्लॅकस्पॉटवर सातत्याने उपस्थिती रहावी म्हणून नागपूर पोलीस विभागाने तंत्रज्ञानाच्या मदतीने क्यू-आर कोड प्रणाली विकसित केली आहे. यामाध्यमातून पोलीस कर्मचाऱ्यांची रस्त्यावरील उपस्थिती वाढवण्यास मदत होणार आहे. राज्यातील हा पहिला प्रयोग आहे, गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी विकसीत करण्यात आलेली ही क्यू आर कोड पद्धत नेमकी कशा प्रकारे कार्यान्वित होते त्याबाबत ईटीव्ही भारतने घेतलेला हा विशेष आढावा..
राज्याची उपराजधानी असलेल्या नागपूरला गेल्या काही वर्षांमध्ये गुन्हे जगतातील क्राईम कॅपिटल म्हणून ओळख मिळाली आहे. अर्थात ही बाब नागपूरकरांसाठी भूषणावह नाही, यातून सर्वसामान्य नागपूरकर जनतेसोबतच पोलिसांची देखील अब्रू वेशीला टांगली जाते. त्यातच नागपूर पोलिसांकडून गुन्हेगारी घटना रोखण्यासाठी अनेक प्रयत्न करून देखील शहरात दिवसागणिक वाढत असलेल्या गुन्हेगारी घटनांमुळे नागपुरात कायद्याचे राज्य कुठेही दिसत नासल्याचा समज जनमानसात निर्माण झाला आहे. त्यावर गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी परिमंडळ झोन एकचे डीसीपी नुरूल हसन यांच्याच संकल्पनेतून क्यू-आर कोड प्रणाली विकसित करण्यात आली आहे. अवघे अडीच लाख रुपये खर्च करून हे सिस्टीम तयार करण्यासाठी आले आहे. येत्या काही दिवसांत याचे फायदे दिसायला लागतील, असा विश्वास हसन यांनी व्यक्त केला आहे.
नागपूर पोलीस विभागाने तंत्रज्ञानाच्या मदतीने क्यू-आर कोड प्रणालीमध्ये शहरातील प्रत्येक झोन अंतर्गत ब्लॅक स्पॉट निवडण्यात आले आहेत, ज्या ठिकाणी नेहमीच गुन्हेगारांचा वावर दिसून आलेला आहे, अशा ब्लॅक स्पॉटवर पोलिसांनी क्यू-आर कोड लावले आहेत. या क्यू-आर कोडला स्कॅन करण्यासाठी चार्ली पथकाला आणि बिट मार्शल असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांना ब्लॅक स्पॉटवर जाणे बंधनकारक करण्यात आले आहे. पोलीस कर्मचाऱ्यांने क्यू-आर कोड स्कॅन केल्यानंतर त्याची नोंद नियंत्रण कक्षातील सॉफ्टवेअर मध्ये होणार आहे. या प्रणालीच्या माध्यमातून पोलीस कर्मचाऱ्यांचा रस्त्यांवरील उपस्थिती वाढणार आहे, ज्यामुळे गुन्हेगारांच्या मनात कायद्याची भीती निर्माण होईल आणि त्यातून गुन्हेगारी घटना कमी होईल, असा दावा पोलीस उपायुक्त नुरूल हसन यांनी केला आहे.
रस्त्यांवर पोलिसांची उपस्थिती वाढेल-
शहरातील विशिष्ट भागात गुन्हेगारांचा वावर सर्वाधिक दिसून येत असल्याचा निष्कर्ष काढल्यानंतर पोलीस विभागाने गुन्हेगारी घटनांवर अंकूश लावण्यासाठी तंत्रज्ञानाचा उपायोग करत ही क्यू-आर कोड प्रणाली विकसित केली आहे. या क्यूआर कोडच्या मदतीने पोलिस कर्मचाऱ्यांचा फिल्ड वरील उपस्थिती वाढणार आहे. पोलीस रस्त्यांवर दिसले की गुन्हेगारी आपसुकच नियंत्रणात येते, हा अनुभव असल्याने पोलिसांनी शहरातील तब्बल पंधराशे ठिकाणी क्यूआर कोड चिटकावले आहेत. बंदोबस्तासाठी बाहेर पडलेल्या चार्ली आणि बिट मार्शलला त्या स्पॉटवर जाऊन क्यू-आर कोड स्कॅन करावा लागणार आहे.
क्यू-आर कोड प्रणाली आहे तरी काय-
नागपूर शहरातील प्रत्येक पोलीस ठाण्याची हद्द तीन ते चार बिट मध्ये विभागण्यात आली आहे. प्रत्येक बीटमध्ये कमीत कमी पंधरा बीट पंचिंग पॉईंट निश्चित करून त्यावर वॉटरप्रूफ क्यू आर कोड बसविण्यात आले आहेत. अशाच प्रकारे परिमंडळच्या सहा पोलीस स्टेशनचे ३७७ बिट पंचिंग पॉईंट ठरवून सर्व पॉईंटवर सुद्धा क्यू-आर कोड बसवण्यात आले आहेत. त्या बीट पॉईंटवर कर्तव्यावर असलेले कर्मचारी आणि बीट मार्शल दिवसपाळी आणि रात्रीपाळीच्या वेळी प्रत्यक्षात स्पॉटवर जाऊन तो कोड आपल्या मोबाईलमध्ये स्कॅन करतील. एका अप्लिकेशनच्या माध्यमातून सर्व डेटा पोलीस मुख्यालय, पोलीस आयुक्त कार्यालय, उपायुक्त कार्यालय आणि पोलीस ठाण्यातील निरीक्षकांपर्यंत पोहोचणार आहे. या माध्यमातून पोलीस कर्मचाऱ्यांकडून गस्त घालण्याचे प्रमाण वाढणार आहे, ज्यामुळे गुन्हेगार मोकळा श्वास घेऊन फिरू शकणार नाहीत