नागपूर - राम मंदिर भूमिपूजन सोहळ्याचा 5 ऑगस्टला सर्वत्र जल्लोष करण्यात आला. अनेक शहरांमध्ये जमावबंदीचे नियम तोडल्याने गुन्हे देखील दाखल करण्यात आले. नागपुरातही भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांवर पोलिसांनी कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी विविध गुन्हे दाखल केले होते. याच पार्श्वभूमीवर भाजपा नेत्यांनी पोलीस आयुक्तांना निवेदन देऊन हे गुन्हे मागे घेण्याची मागणी केली आहे. भाजपा महामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नेतृत्वात हे निवेदन पोलीस आयुक्तांना देण्यात आले.
5 ऑगस्टला संपूर्ण देशात राम मंदिराचा जल्लोष पाहायला मिळाला. अनेकांनी फटाक्यांची आतषबाजी करत आपला आनंद व्यक्त केला, तर विविध राजकीय पक्षांकडून देखील सार्वजनिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. याच पार्श्वभूमीवर नागपुरातही भारतीय जनता पक्षातर्फे कार्यक्रम राबवण्यात आले. मात्र, कोरोनाच्या काळात जमाबंदीसारख्या कायद्यांचे उल्लंघन केल्याप्रकरणी भाजपाच्या अनेक कार्यकर्त्यांवर पोलिसांनी गुन्हे दाखल केले. हे गुन्हे मागे घेण्यात यावे यासाठी आज भाजपा नेत्यांनी पोलीस आयुक्तांना निवेदन दिले. तसेच भारतीय जनता पक्षाकडून कोणत्याही नियमांचे उल्लंघन झाले नसताना पोलिसांनी मुद्दाम हे पाऊल उचलल्याचा आरोप चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला आहे.
राज्य शासन व पोलिसांकडून राम मंदिर भूमिपूजनाच्या जल्लोष कार्यक्रमाला उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न करणे चुकीचे असल्याचे ते म्हणाले. त्यामुळे आमच्यावरील गुन्हे मागे घेण्यात यावे, अशी मागणी या निवेदनातून करण्यात आली. फक्त राम मंदिराच्या भूमिपूजन कार्यक्रमाच्या दिवशीच पोलिसांची अशी वागणूक योग्य नाही, असे बावनकुळेंनी अधोरेखित केले. यावेळी भाजपा आमदार कृष्णा खोपडे, आमदार गिरिश व्यास, आमदार प्रविण दटके आदी नेते उपस्थित होते.