नागपूर - शहरातील नवीन कामठी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील लिहिगाव शिवारात एक भीषण अपघात झाला. भरधाव चारचाकी गाडीने दुचाकीला मागून दिलेल्या धडकेत माय-लेकाचा मृत्यू झाला आहे. अनिकेत गोपाल खुरपुडी (२१) आणि त्याची आई मनीषा गाेपाल खुरपुडी (४४) अशी मृतांची नावे आहेत.
कामठी तालुक्यातील गादा येथील अनिकेत आणि त्याची आई मनीषा हे दाेघे मंगळवारी दुचाकीने उमरेड तालुक्यातील वडद येथे गाव पूजेसाठी गेले होते. बुधवारी सकाळी ते परत येत असताना भरधाव कारने त्यांच्या दुचाकीला मागून जोरदार धडक दिली. या धडकेत अनिकेत आणि त्याच्या आईचा घटनास्थळीच मृत्यू झाला. अपघात झाल्यानंतर कारच्या ड्रायव्हरने घटनास्थळावरून पळ काढला. अनिकेतच्या वडिलांचे काही वर्षांपूर्वी निधन झाले होते.
घटनेची माहिती समजताच नवीन कामठी पोलीस ठाण्याचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. दोन्ही मृतदेह कामठी येथील उपजिल्हा रुगणालयात उत्तरीय तपासणी करिता पाठवले आहेत. पोलिसांनी अपघाताची नोंद करून पुढील तपास सुरू केला आहे.