नागपूर - जिल्ह्याच्या मध्यवर्ती कारागृहात कोरोनाचा शिरकाव झाल्यानंतर २४ तासांत ५५ कर्मचाऱ्यांचे आणि त्यांचे कुटुंबीय पॉझिटिव्ह आले होते. यामध्ये आज पुन्हा १२ कर्मचाऱ्यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने हा आकडा ६७ झाला आहे.
नागपूरच्या मध्यवर्ती कारागृहात केवळ दोनच दिवसात अधिकाऱ्यांसह ६७ कर्मचारी कोरोनाबाधित आढळल्याने खळबळ माजली आहे. यामध्ये १२ बंदिवान,०५ अधिकारी,०१ महिला डॉक्टर आणि २८ कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. याव्यतिरिक्त संबंधित कर्मचाऱ्यांच्या १२ नातेवाईकांना देखील कोरोनाची लागण झालेली आहे.
सध्या नागपूर मध्यवर्ती कारागृहातून पेरोल वर सोडललेल्या साडे सातशे कैद्यानंतर कारागृहात जवळपास अठराशे कैदी आहेत. याच कैद्यांवर नजर ठेवण्यासाठी सध्या नागपूर मध्यवर्ती कारागृहातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या दोन टीम्स तयार करण्यात आल्या आहेत. या टिम्स प्रत्येकी पंधरा दिवस कारागृहाच्या आत आणि पुढील पंधरा दिवस क्वारंटाइन अशा स्वरुपात काम करतात.
११ जून ते २६ जून दरम्यान तुरुंग प्रशासनातील जे अधिकारी आणि कर्मचारी कारागृहाच्या आत होते. त्यापैकी एक कर्मचारी कारागृहातून बाहेर आल्यानंतर कोरोनाबाधित असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर कारागृहात तैनात असलेले उर्वरित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची प्रतिदिन कोरोना चाचणी करण्यात येत असून आता बाधितांचा आकडा ६७ झाला आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात कारागृहातील कर्मचाऱ्यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्याने आता कैद्यांना देखील संक्रमणाची शक्यता वाढलीय.