नागपूर - भ्रष्टाचाराचे आरोप करणारे वकील सतीश उकेंना (Adv Satish Uke) 50 कोटींची अब्रुनुकसानीची नोटीस (Legal Notice for Defamation) पाठवल्याची माहिती माजी मंत्री व आमदार चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी दिली आहे. कोट्यवधी रुपयांचा काळा पैसा गोळा केल्याचा आरोप करत वकील उके यांनी प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न केल्याचे चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले. वकील पायल खरे यांच्या माध्यमातून ही नोटीस 2 फेब्रुवारीला पाठवण्यात आली आहे.
राजकीय षडयंत्रातून बदनाम करण्याचा प्रयत्न - बावनकुळे
याप्रकरणात वकील सतीश उकेंना ५० कोटी रुपयांच्या अब्रुनुकसानीची न्यायालयीन नोटीस बजावली आहे. महत्त्वाचे म्हणजे या संदर्भात बावनकुळे फौजदारी गुन्हा दाखल करणार आहेत. चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, माझे नातलग सुरज तातोडे यांनी केलेले सर्व आरोप निराधार असून, राजकीय षडयंत्रातून बदनाम करण्याचा हा प्रयत्न आहे. कुणाच्या घरात कलह निर्माण करायचा, नातेवाईकाला पकडायचे, भडकवायचे आणि खोटेनाटे आरोप करायचे, हे काम सुरज तातोडे यांच्या माध्यमातून वकील सतीश उके करत आहेत. म्हणून आज त्यांना ही न्यायालयीन नोटीस पाठवली आहे.
सुरज तातोडे आणि वकील सतीश उके यांनी भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर केलेले आरोप खोटे आहेत. सुरज तातोडेची मानसिक प्रकृती बिघडली तेव्हा खासगी रुग्णालयातील उपचाराचा खर्च चंद्रशेखर बावनकुळे यांनीच केला असल्याचा दावा सुरजचा लहान भाऊ निरज तातोडे यांनी केला आहे.