नागपूर - कोकणात गाजत असलेल्या केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या जनआशीर्वाद यात्रेतील प्रत्येक ॲक्शनला शिवसेनेचे कार्यकर्ते रिॲक्शन देणारच असल्याची प्रतिक्रिया उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिली आहे. ते आज नागपूर दौऱ्यावर आले असता विमानतळावर पत्रकारांसोबत बोलत होते. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याबद्दल कुणीही चुकीचे उद्गार काढल्यास शिवसेनेचे कार्यकर्ते खपवून घेणार नसल्याचा इशारा त्यांनी नारायण राणे यांना दिला आहे.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे आमच्यासाठी दैवताप्रमाणे आहेत. त्यांच्याबद्दल कोणीही चुकीचं बोलल्यास खपवून घेतलं जाणार नाही. जशास तसे उत्तर देण्यासाठी आमचे शिवसैनिक तयार आहेत. मुंबईत नारायण राणे यांच्या घरासमोर युवासेनेच्या कार्यकर्त्यांनी घातलेला राडा हा भावनांचा उद्रेक होता, असे देखील उदय सामंत म्हणाले आहेत. जनआशीर्वाद यात्रा करत असताना जनतेचे आशीर्वाद हे आपल्याला चांगल्या कामातून कसे मिळतील यासाठी केंद्र सरकारच्या मनात असेल पण जनआशीर्वाद यात्रेतून शिवसेना आणि उद्धव ठाकरे यांच्यावर टीका झाली, त्याचा काहीही फरक शिवसेनेला पडत असल्याचे देखील ते म्हणाले आहेत.
पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंचा निर्णय मान्य-
नारायण राणे प्रकरणानंतर भाजपच्या संदर्भात शिवसेनेची भूमिका मवाळ झाली असल्याचं बोललं जातं आहे. यावर उदय सामंत यांना विचारले असता ते म्हणाले की, उद्धव ठाकरे यांनी घेतलेला प्रत्येक निर्णय शिवसैनिकांना बंधनकारक असतो. त्यामुळे भविष्यात दोन पक्षातील मतभेद दूर होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेत्यांच्या बैठकीचे स्वागत -
महाराष्ट्राच्या भल्यासाठी आणि विकासासाठी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यात बंद दाराआड चर्चा झाली असेल तर त्याचे मी स्वागत करतो, अशी प्रतिक्रिया उदय सामंत यांनी दिली. महाराष्ट्राच्या विकासासाठी अशा भेटी घेण्यात काही गैर नसल्याचं देखील ते म्हणाले आहेत.