नागपूर - राज्यात काँग्रेस पक्षाचे पुढील प्रदेशाध्यक्ष कोण होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे,त्याच बरोबर या संदर्भात काँग्रेसमध्येदेखील खलबते सुरू आहेत. यावर मंत्री सुनील केदार यांना प्रश्न विचारला असता यावर आपण अधिक बोलणे उचित होणार नसल्याची सावध भूमिका घेतली आहे. आज ते सावनेर तालुक्यातील पाटनसावंगी येथे मतदानासाठी आले असता पत्रकारांशी संवाद साधला, त्यावेळी त्यांनी अनेक प्रश्नांची उत्तरे दिली. मात्र धनंजय मुंडे प्रकरण आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष कोण या विषयावर त्यांनी फारसे स्पष्ट बोलणे टाळले.
प्रदेशाध्यक्षपदाच्या शर्यतीत?
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पदाच्या शर्यतीत सध्या विधानसभा अध्यक्ष नाना पटोले आणि मंत्री विजय वडेट्टीवार यांची नावे पुढे असल्याचे बोलले जात आहे. मात्र सुनील केदार यांच्याकडे असलेल्या संघटन कौशल्यामुळे आणि पक्षबांधणीसाठी आक्रमक भूमिका घेण्याची क्षमता असल्याने दबक्या आवाजात त्यांच्या नावाची चर्चा सुरू झाली आहे.
'तुम्हाला प्रदेशाध्यक्ष पद मिळाले तर...'
आपल्याला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्षपद मिळाल्यास आनंद होईल का, असा प्रश्न विचारला असता सुनील केदार यांनी अतिशय सावध भूमिका घेत प्रदेशाध्यक्षपदाचा निर्णय केंद्रीय नेतृत्व घेणार असून पक्षात अनुशासन असलेच पाहिजे, असे सांगून यावर आपण अधिक बोलणार नसल्याचे केदार यांनी म्हटले आहे.
'राम कदमांचे वक्तव्य आधी आठवावे'
केदार यांनी धनंजय मुंडे यांची पाठराखण केली आहे. चौकशीचा पूर्ण निकाल हाती येत नाही, तोपर्यंत जबाबदार व्यक्तीने बोलणे योग्य नाही. चंद्रकांत पाटलांनी मुंडेंचा राजीनामा मागितला, मात्र त्यांच्या पक्षाचे नेते राम कदम यांनी केलेले वक्तव्य आठवावे मग बोलावे, असा टोमणादेखील त्यांनी लावला आहे.