नागपूर - गेल्या महिन्याभरात नागपुरातील कोरोना रुग्ण संख्या झपाट्याने वाढत आहे. प्रशासन व शासनाकडून नियंत्रणासाठी शर्तीचे प्रयत्न सुरू आहेत. परंतु, नागरिकांकडून मात्र सकारात्मक प्रतिसाद मिळत नसल्याने रुग्ण संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होतच असल्याचे दिसून येत आहे. याच पार्श्वभूमीवर नागपूरचे महापौर संदीप जोशी यांच्याकडून स्वतः रस्त्यावर उतरत जनजागृती केली जात आहे.
कोरोनाची वाढती स्थिती सर्वासाठीच चिंताजनक ठरत आहे. अशात नागरिकांनी प्रशासनाकडून आखून दिलेल्या नियमांचे पालन होत नसल्याचे अनेक ठिकाणी दिसून येत आहे. नागपुरातही कोरोना रुग्णांची संख्या गंभीर आहे. विशेषतः नागपुरात मृत्यूदर अधिक दिसून येत आहे. याच पार्श्वभूमीवर महापौर संदीप जोशी यांच्याकडून रस्त्यावर उतरत नागरिकांना आवाहन केले जात आहे.
काम नसताना बाहेर पडू नका, शिवाय मास्क वापरा या सूचनाही महापौरांकडून दिल्या जात आहेत. शहरातील विविध बाजारपेठांमध्ये जावून महापौर स्वतःच्या गाडीतून नागरिकांना आश्वस्त करत करत असल्याचे पहायला मिळत आहे. शिवाय शहरातील मृत्युदर वाढण्यामागे आपले बेजबाबदारपण कारणीभूत ठरत असल्याचेही महापौरांकडून नागरिकांना सुचविले जात आहे. त्याचबरोबर आपल्या घरातील एखाद्या व्यक्तीचा मृत्यू होण्याची वाट पाहत आहात का? असा प्रश्न देखील महापौरांकडून नागरिकांना केला जात आहे. त्यामुळे गर्दी करून स्वतःचा जीव धोक्यात घालू नका, असे आवाहनही महापौरांनी केले जात आहे. विशेष म्हणजे महापौर सकाळी शहरातील बाजारपेठांमध्ये जाऊन जनजागृती करत असल्याचे दृश्य सध्या पाहायला मिळत आहे.
आज शहरातील गोकुळपेठ, लकडगंज बाजारपेठ अशा विविध ठिकाणी जावून जनजागृती केल्याचेही महापौर संदीप जोशी यांनी सांगितले. त्यामुळे महानगरपालिका प्रशासनाकडून वारंवार जनजागृती करूनही नागरिकांमध्ये कोरोनाबाबत गांभीर्य दिसून येत नाही, त्यामुळे ही मोठी दुर्दैवी बाब असल्याचे महापौर यांनी सांगितले. शिवाय नागरिकांमध्ये यापुढे महापौर म्हणून स्वतः रस्त्यावर उतरत जनजागृती करणार असल्याचेही महापौर संदीप जोशी म्हणाले. शिवाय जिथे जिथे गरज भासेल तिथे दंड देखील ठोठावणार असल्याचे जोशी यांनी सांगितले. त्यामुळे शहरात गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना गर्दी करू नये, त्याचबरोबर सोशल डिस्टन्सींगचे नियम पाळावे असे आवाहनही महापौर संदिप जोशी करत असल्याचे दिसून येत आहे.