नागपूर - महापालिकेतील महापौर विरुद्ध आयुक्त वाद आता शिगेला पोहोचला आहे. महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी नागपूर स्मार्ट सिटी प्रकल्पात बेकायदेशीर कारभार केल्याचा आरोप महापौर संदीप जोशी यांनी केला. या प्रकरणी महापौर संदीप जोशी यांनी आयुक्त तुकाराम मुंढे यांच्याविरुद्ध नागपूरच्या सदर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार अर्ज दाखल केला आहे. स्मार्ट सिटी प्रोजेक्टचे सीईओ म्हणून तुकाराम मुंढे यांनी खासगी कंत्राटदारांना फायदा होईल, यासाठी दस्ताएवजांमध्ये फेरफार केल्याचा आरोप महापौर संदिप जोशी यांनी केला आहे.
स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत सरकारच्या आदेशानुसार स्मार्ट सिटी कंपनीची स्थापना करण्यात आली. महापालिका आयुक्त मुंढे हे या कंपनीत बोर्ड ऑफ डायरेक्टर व सीईओ म्हणून स्वतः हुन नियुक्त झाले आहेत. वास्तविक पाहता बोर्ड ऑफ डायरेक्टरच्या मान्यते नंतरच नव्या सदस्याचा संचालक मंडळात समावेश केला जातो, परंतु 31 डिसेंबर नंतर संचालक मंडळाची एकही बैठक न होता आयुक्त तुकाराम मुंढे हे बेकायदेशीररित्या संचालक मंडळ सदस्य व सीईओ झाले. शिवाय स्मार्ट सिटी प्रकल्पाची बँकेत असलेली 18 कोटींची ठेवीची रक्कम 2 खासगी कंत्राटदारांना वळत्या करण्यात आल्याचा आरोपही महापौर संदीप जोशी यांनी केला.
शासनाच्या बँकेतील ठेवी आयुक्त मुंढे यांनी नियम धाब्यावर बसवून तोडण्यात आल्याचा आरोप महापौरांनी केला. यासह घनकचरा व्यवस्थापन करण्यासाठी प्रदान करण्यात आलेले 42 कोटी रुपयांचे कंत्राट रद्द करून 50 कोटीं रुपयांचे नवे कंत्राट काढल्याचा आरोप महापौर संदीप जोशी यांनी केला. या सर्व प्रकरणाची चौकशी करण्यात यावी अशी मागणी संदीप जोशी यांनी करीत पोलिसांत तक्रार अर्ज दाखल केला आहे.