नागपूर - काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केंद्र सरकारसह पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार टीकास्त्र सोडलं आहे. कोरोना रुग्णांना सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यात ते सपशेल अपयशी ठरले असल्याचा गंभीर आरोप पटोले यांंनी केला. कोरोना महामारी संदर्भातील उपाययोजना करण्यासाठी गेल्या वर्षाच्या जानेवारीपासून राहुल गांधी सांगत आहेत. मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्याकडे साफ दुर्लक्ष केले, त्यामुळे आज केवळ भारतातील जनताच नाही तर संपूर्ण जगात पंतप्रधानांची थू थू सुरू आहे. मात्र, आमच्या पंतप्रधानांची जगात बदनामी होईल असे काँग्रेसचे धोरण नसल्याचं देखील नाना पटोले म्हणाले आहेत
हेही वाचा - आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांचे आरोग्य खाते काढून घ्या; गोव्याचे राजकारण पेटले
गेल्या दीड वर्षापासून आपला देश कोरोना विषाणूंशी लढा देत आहे. केंद्र सरकारला ऑक्टोंबर महिन्यातच कोरोनाची दुसरी लाट येणार असल्याचे कळल्यानंतर देखील केंद्राने त्यासंदर्भात उपाययोजना करण्याऐवजी आपल्या देशातून कोरोना संपलेला आहे असंच एका प्रकारे जाहीर केलं, ज्यामुळे आज कोरोनाची दुसरी लाट लाखो लोकांच्या जिवावर उठलेली आहे. केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे आपल्या देशाची चिंता आणि चिता वाढल्या असल्याचे देखील नाना पटोले म्हणाले आहेत. आपल्या देशातून कोरोना गेल्याचं केंद्राने जाहीर केल्यामुळे लस उत्पादन करणाऱ्या कंपन्यांनी परदेशातून मिळणाऱ्या ऑर्डर्स स्वीकारल्या आहेत. लसीकरणाच्या अनुषंगाने केंद्र सरकारने एक निश्चित धोरण तयार करून लसीकरणाची मोहीम राबवण्याची गरज असल्याचे देखील नाना म्हणाले आहेत.
महाराष्ट्रातील भाजप नेत्यांनी खोटे दावे करू नये -
लसीकरणाबाबतीत महाराष्ट्रातील भाजपचे नेते रोज नवनवीन दावे करत आहेत. पण वास्तविकतेमध्ये महाराष्ट्रातील जनतेला लस उपलब्ध होत नसल्याचे सत्य ते नाकारू शकत नाही. त्यामुळे महाराष्ट्रातील भाजप नेत्यांनी राजकारण बाजूला सारून सर्वाधिक लस महाराष्ट्राला कशा मिळतील यासंदर्भात प्रयत्न करण्याचा सल्ला नानांनी दिला आहे.
मी आजही सामना वाचला नाही -
दिल्लीतील काँग्रेसचे शीर्ष नेतृत्व सामना या वृत्तपत्राची दखल घेतात. मात्र, राज्यातील काँग्रेस नेत्यांना सामना वाचायला का मिळत नाही या प्रश्नावर नाना पटोले म्हणाले की, मी आजही सामना वाचलेला नाही, त्यामुळे काय छापून आलेलं आहे हे मला माहिती नाही.
हेही वाचा -'पीएम केअर्स' फंडातले व्हेंटिलेटर कुठायत? काही निकामी, तर काहींसाठी तंत्रज्ञच नाही...