नागपूर - प्रभू राम हे हिमालया प्रमाणे धैर्यवान आहेत. सागराप्रमाणे गंभीर आहेत. राष्ट्राला एकसंध बांधण्याचे काम प्रभू रामांनी केले आहे. ते केवळ राम नाहीत, तर आपल्या सर्वांसाठी राष्ट्र आहेत, तसेच ते आपले राष्ट्रदेव असल्याची भावना राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी व्यक्त केली आहे. ते नागपूर येथील पोदारेश्वर मंदिरात बोलत होते. रामजन्मभूमीवर राममंदिर निर्माण कार्यासाठी लोकसहभागातून निधी संकलन केला जात आहे. याचा शुभारंभ नागपुरात राज्यपाल कोश्यारी यांच्या हस्ते करण्यात आला.
राज्यपालांनी दिली लाखाची वर्गणी-
यावेळी शहरातील वेग-वेगवेगळ्या 35 ठिकाणांहून निधी संकलनाच्या उपक्रमाला सुरुवात झाली. यावेळी मंदिरात हिंदू धर्म आचार्य सभेचे अध्यक्ष जूनापीठाधीश्वर आचार्य महामंडलेश्वर स्वामी अवधेशानंद गिरी महाराज हे उपस्थित होते. राज्यपाल यांनी राम मंदिर निर्माणसाठी 1 लाख 11 हजाराचा निधी दिला आहे. तेच स्वामी अवधेशानंद गिरी यांनीही 1लाख रुपये दिले.
रामराज्याचा दिवस दूर नाही-
यावेळी पुढे बोलताना राज्यपाल म्हणाले, राममंदिर निर्माणचा संकल्प अजून पूर्ण झाला नाही. जेव्हा प्रत्येकजण हे ठरवेल की रामराज्य आणायचे आहे, त्यादिवशी ही तपस्या सार्थकी लागले. आपण रामराज्य आणण्याच्या योग्य मार्गावर चालत आहोत. आपण राज्याला काय देऊ शकतो या उद्देशाने चाललो तर रामराज्याचा दिवस दूर नाही.
भारताकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे. संतांच्या आशीर्वादाने पुढील पिढी हे रामराज्य आणण्यास समर्थ असावी, यासाठी हे कार्य करत आहोत. खुल्या मनाने आणि घराघरातून राममंदिर निर्माण आणि रामराज्यासंदर्भात जागृती करायची आहे. त्यासाठी सर्वांचे योगदान गरजेचे आहे. त्यामुळे कार्य लवकर सफल होईल, असा विश्वास राज्यपाल कोश्यारी यांनी या निमित्याने बोलून दाखवला.