नागपूर - कोरोना विषाणूंचा धोका वाढत असल्याने देश पातळीवर 'कोविड केअर सेंटर' तयार करण्याच्या कामाला वेग आलेला आहे. देशात कोरोना बाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे, त्याच प्रमाणे नागपुरात सुद्धा कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये मोठी वाढ होण्याची भीती व्यक्त केली जात असल्याने खबरदारीचा उपाय म्हणून जिल्ह्यात तब्बल पाच हजार खाटांचे कोविड केअर सेंटर सुरू करण्यात आले आहे. सर्व सोयी सुविधांयुक्त असे हे केअर सेंटर आहे.
नागपूर महानगरपालिकेने काटोल मार्गावरील राधास्वामी सत्संग फेटरी येथे आठ दिवसात पाच हजार खाटांचे "कोविड केयर सेंटर" उभारले आहे. आपत्कालीन स्थितीत श्री राधास्वामी सत्संग न्यासने पुढे येत आपली भव्य जागा महानगरपालिकेला उपलब्ध करुन दिली आहे. मनपाने याठिकाणी रुग्णांच्या स्क्रिनींग, क्वारंटाइन आणि आयसोलेशनची सोय उपलब्ध केली आहे. एकूणच, केंद्र शासन आणि राज्य सरकारने ‘कोविड केअर सेंटर’बाबत ठरवून दिलेल्या सर्व मार्गदर्शक तत्वांचे पालन करूनच हे सेंटर उभारण्यात आले आहे. नागपूर शहरात उभारण्यात आलेले अशा हे राज्यातील सगळ्यात मोठे, आणि सगळ्यात जलद तयार झालेले कोविड केअर सेंटर आहे. यामध्ये सद्यस्थितीत ५०० बेड तयार करण्यात आले असून, गरजेनुसार ते पुढे वाढविण्यात येणार आहेत. या सेंटरला आज मनपा आयुक्त श्री. तुकाराम मुंढे यांनी भेट देऊन येथील संपूर्ण व्यवस्थेची पाहणी केली.
येथे महिला आणि पुरुष रुग्णांसाठी स्वतंत्र बेड आणि प्रसाधनगृहांची व्यवस्था आहे. प्रत्येक बेडला क्रमांक देण्यात आले असून तोच रुग्ण क्रमांक राहील. प्रत्येक १०० बेडच्या मागे २० डॉक्टर, वैद्यकीय चमू आणि इतर कर्मचाऱ्यांचे पथक कार्यरत असणार आहे. विलगीकरण केलेल्या रुग्णांसाठी आवश्यक ती सर्व वैद्यकीय व्यवस्था येथे करण्यात आली आहे. त्यांचे तापमान तपासणी, रक्त तपासणीही येथे केली जाणार आहे. येथे दाखल केलेल्या रुग्णांचे स्वॅब नमुनेही सेंटरवरच गोळा केले जातील.स्वॅबच्या अहवालानंतर रुग्ण जर पॉझिटिव्ह असेल आणि प्रकृती अतिगंभीर असेल, तरच त्याची रवानगी रुग्णालयातील कोव्हिड कक्षात करण्यात येईल. मात्र पॉझिटिव्ह असतानाही जर प्रकृती गंभीर नसेल, सहज उपचार शक्य असतील तर त्याला तेथेच अन्य कक्षात स्थलांतरित केले जाईल. रुग्णांसोबतच या ठिकाणी वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी, पोलिस अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या राहण्याचीही व्यवस्था करण्यात आली आहे.