नागपूर - भारतीय पोलीस सेवेतील अधिकारी अमितेश कुमार यांची शहराचे नवे पोलीस आयुक्त म्हणून नियुक्ती झाली आहे. डॉ. भूषण कुमार उपाध्याय यांची बदली मुंबईला अप्पर पोलीस महासंचालक पदावर झाली आहे. वाहतूक विभागाचा कार्यभार त्यांच्याकडे सोपवण्यात आलाय. दोन वर्षांचा कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतर डॉ.भूषण कुमार उपाध्याय यांच्या बदलीची चर्चा होती. अखेर आज बदलीचे आदेश निर्गमित करण्यात आले.
अमितेशकुमार हे 1995 बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत. ते 2005 ते 2007 या काळात नागपूर शहर पोलीस दलातील परिमंडळ - 2 चे पोलीस उपायुक्त म्हणून कार्यरत होते. त्यावेळी मॅच फिक्सिंगच्या प्रकरणाला त्यांनी वाचा फोडली होती. अमितेशकुमार उद्या आपल्या पदाची सूत्र हाती घेणार असल्याची माहिती समोर आली आहे.
गेल्या काही वर्षांत उपराजधानी क्राइम कॅपिटल म्हणून उदयाला आली आहे. त्यामुळे नागपुरातील गुन्हेगारांवर वचक ठेवण्यासाठी ते नक्की कशाप्रकारे उपाययोजना करणार, याकडे सर्वांचे लक्ष आहे.
दरम्यान, उद्धव ठाकरे सरकार आल्यानंतर राज्यातील प्रशासकीय बदलांचे संकेत होते. महाविकास आघाडी सरकार आल्यानंतर राज्यभरात प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या तत्काळ बदल्या करण्यात आल्या. तसेच कोरोना काळात देखील मोठ्या प्रमाणात प्रशासकीय बदल झाले. मागील दोन दिवसांत कायदा आणि सुव्यस्थेवर नियंत्रण कायम ठेवण्यासाठी आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदलीचे आदेश गृहमंत्रालयातून निघाले आहेत. यामध्ये विश्वास नांगरे पाटील यांच्या बदलीचा देखील आदेश आहे.