नागपूर : नागपूरच्या विदर्भ क्रिकेट असोसिएशन मैदानावर शुक्रवारी दुसरा टी-२० क्रिकेट सामना खेळला जाणार आहे. नागपुरातील जामठा येथील सुरक्षेच्या दृष्टीने
नागपूर शहर पोलीस दलातर्फे सर्व नियोजन करण्यात आले असल्याची माहिती नागपूर शहराचे पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी ( Nagpur City Police Commissioner Amitesh Kumar ) दिली आहे. मैदानाच्या आत आणि मैदानाबाहेर तगडा बंदोबस्त तैनात केला ( Nagpur City Police Force in Terms of Security ) जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले आहे. खेळ सुरू असताना कुणीही हुल्लडबाजी केल्यास त्यांच्यावर कडक कारवाई केली जाणार असल्याचा इशारा त्यांनी दिला आहे.
वाहतूककोंडी टाळण्यासाठी ग्रीन कॉरिडॉर : नागपूरच्या जामठा मैदानावर ज्यावेळी क्रिकेट सामना आयोजित करण्यात आलेला आहे. त्या प्रत्येक वेळी वाहतूककोंडीची मोठी समस्या निर्माण झाली आहे. पूर्वइतिहास लक्षात घेता नागपूर पोलिसांनी विशेष नियोजन केले आहे. मॅच संपल्यानंतर परत जाणाऱ्या गर्दीसाठी व्हीसीए स्टेडियम ते रहाटे कॉलनीपर्यंत ग्रीन कॉरिडॉर तयार केला जाणार आहे. याशिवाय काही खासगी मार्गांचा उपयोग केला जाणार आहे. त्यातून वाहतूककोंडी होणार नाही, असा विश्वास पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी व्यक्त केला आहे.
वाहतूककोंडीवर तोडगा काढला : नागपुरात क्रिकेट मॅच होत असल्यामुळे केवळ नागपूरच नाही तर विदर्भातून आणि मध्यप्रदेश छत्तीसगड राज्यातूनही क्रिकेट रसिक मोठ्या प्रमाणात येतात. त्यामुळे अनेक तास वाहतूककोंडीचा सामना करावा लागतो. त्यामुळे हा त्रास टाळायचा असेल तर चिंचभवनपर्यत मेट्रोचा पर्याय निवडावा, याशिवाय पब्लिक ट्रान्सपोर्टची सुविधा पुरवली जाणार आहे. जे प्रेक्षक स्वतःचे वाहन घेऊन येतील त्यांनी चालकांला गाडीत थांबवावे, असे निर्देश देण्यात आले आहेत.
वाहनधारकांना सूचना : दुचाकीने स्टेडियम वर येणाऱ्या प्रत्येक वाहन चालकाने हेल्मेट घालणे अनिवार्य करण्यात आले आहे. हेल्मेट नसलेल्या वाहनचालकावर तात्काळ दंडात्मक कारवाई केली जाणार आहे. स्टेडियमवर ट्रिपल सीट येणाऱ्या वाहनांवर देखील दंडात्मक कारवाई करण्याच्या सूचना देण्यात आली आहे.
पार्किंगची समस्या ठरणार त्रासदायक : जामठा स्टेडियमच्या परिसरात चांगला पाऊस झाला असल्यामुळे व्हिसीए स्टेडियमच्या शेजारीच असलेल्या पार्किंग मैदानात चिखल जमा झाला आहे. त्यामुळे पार्किंगकरिता अडचण येऊ शकते. त्यामुळे पोलिसांनी पर्यायी जागी पार्किंगची व्यवस्था केली आहे. त्यामुळे क्रिकेटप्रेमींना एक ते दोन किलोमीटरची पायपीट करावी लागणार आहे.
प्रेक्षकांनी हुल्लडबाजी करू नका : व्हिसीएच्या जामठा स्टेडियमवर प्रत्येक जागी सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहे. मॅच दरम्यान हुल्लडबाजी करणाऱ्या प्रेक्षकांवर कारवाई केली जाऊ शकते, त्यामुळे प्रेक्षकांनी नियमात राहूनचं मॅचचा मनसोक्त आनंद लुटावा असे आवाहन पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी केले आहे.