नागपूर - खासदार सांस्कृतिक महोत्सव समिती,नागपूर तर्फे आजपासून (गुरुवारी) नागपुरात खासदार करंडक एकांकिका स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या पत्नी कांचन गडकरी यांच्या हस्ते स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. लक्ष्मीनगर येथील सायंटिफिक सभागृहात आयोजित या कार्यक्रमात कांचनताई गडकरी यांचा हस्ते दिप प्रज्वलन करून एकांकिका स्पर्धेला सुरुवात करण्यात आली.
केंद्रीय रस्ते व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून आणि त्यांच्या प्रयत्नाने नागपूरमध्ये दरवर्षी 'खासदार करंडक' स्पर्धेचे आयोजन केले जाते. याअंतर्गत यंदा नागपुरात एकांकिका स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून खासदार करंडक एकांकिका स्पर्धेचे उद्घाटन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या पत्नी आणि संस्कार भारतीच्या अध्यक्षा कांचन गडकरी यांच्याहस्ते करण्यात आले. यावेळी अनेक ज्येष्ठ कलावंत, रंगकर्मी उपस्थित होते.
२४ एकांकिकांचे होणार सादरीकरण
आजपासून 3 दिवस चालणाऱ्या या खासदार करंडक एकांकिका स्पर्धेत एकूण २४ एकांकिकांचे सादरीकरण होणार आहे. शिवाय यामधून जवळपास ५०० हून अधिक रंगकर्मींचा कलाविष्कार नाट्य रसिकांना पाहण्यास मिळणार आहे. नागपूर येथे आज २८, २९ व ३० ऑक्टोबर रोजी सादर होणाऱ्या या स्पर्धा आणि पारितोषिक वितरण समारंभाचे ओटीटी व्यासपीठावरून जगभरात थेट प्रक्षेपण केले जाणार आहे.
हेही वाचा - ऐन दिवाळीच्या दिवसांत एसटी कर्मचाऱ्यांचा संप, प्रवाशांची गैरसोय