नागपूर - कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत नागपूर जिल्ह्यात संसर्गदर (पॉझिटिव्हिटी रेट) 50 टक्यांच्या जवळ गेल्यानंतर प्रचंड वेगात खाली आलेला आहे. अवघ्या दहा दिवसांत संसर्गदर 40 टक्यांनी खाली आल्यामुळे नागपूरकरांना मोठा दिलासा मिळाला आहे. त्याचबरोबर सक्रिय रुग्णांची संख्या देखील मोठ्या प्रमाणात कमी झालेली आहे.
हेही वाचा - Vijay Wadettiwar On PM : मोदी म्हणतात भाजपची लाट, युपीत खरी असंतोषाची, बेरोजगारीची लाट - वडेट्टीवार
दिलासादायक बाब म्हणजे, नागपूरमध्ये रुग्ण बरे होण्याची टक्केवारी 97 टक्के झाल्यामुळे येत्या काळात नागपूर पुन्हा एकदा कोरोनामुक्तीकडे वाटचाल करत असल्याचे बघायला मिळत आहे.
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत अक्षरशः होरपळून निघालेल्या नागपुरात तिसरी लाट आली केव्हा आणि गेली केव्हा याचा अंदाज कुणालाच आला नाही. १ जानेवारीपासून रुग्ण वाढण्यास सुरुवात झाली होती, मात्र महिना संपता-संपता रुग्णसंख्या देखील घटू लागली होती. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा कार्यकाळ केवळ महिनाभर राहिला, असे म्हंटले तर चुकीचे ठरणार नाही. साधारणपणे फेब्रुवारी महिन्याच्या एक तारखेपासून कोरोनाच्या तिसऱ्या लाटेला उतरती कळा लागली होती. आता तर संसर्गदर देखील 7 टक्क्यांच्या आत आल्याने मोठा दिलासा आरोग्य यंत्रणांना, सोबतच नागरिकांना मिळाला आहे.
10 दिवसांत 40 टक्के घट
साधारणपणे 1 जानेवारीपासून नागपुरात कोरोना रुग्णांची संख्या वाढण्यास सुरुवात झाली होती. सुरुवातीला मंद असलेली गती 10 जानेवारी रोजी 11 टक्क्यांवर जाऊन पोहोचली होती. तर, 20 जानेवारी रोजी रुग्णवाढीचा दर हा 39 टक्क्यांवर गेला होता. 25 जानेवारीला तर संसर्गदर हा 43 टक्क्यांवर गेला होता, मात्र 30 जानेवारीला रुग्ण वाढण्याची टक्केवारी काहीशी कमी म्हणजे 33 टक्के नोंदवण्यात आली. त्यानंतर 1 फेब्रुवारी रोजी 26 टक्के आणि 10 फेब्रुवारीला पॉझिटिव्हिटी रेट हा 6.6 टक्क्यांवर आलेला आहे.
हेही वाचा - Nagpur Viral Video : वार्डात भूमीपूजनासाठी गेलेल्या नगरसेवकावर नागरिकांनी केला प्रश्नांचा भडिमार