नागपूर - नागपूरसह संपूर्ण विदर्भात थंडीची तीव्रता वाढल्याने नागरिकांना स्वेटर आणि कानटोप्या परिधान करून स्वतःचे रक्षण करावे लागत आहे. जागोजागी शेकोट्यासुद्धा पेटायला सुरुवात झाली आहे. उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे विदर्भात गारठणारी परिस्थिती निर्माण झाली आहे. बाप्पाला सुद्धा थंडी लागत असेल, या कल्पनेने नागपुरातील गणपती बाप्पाचे भाविक अस्वस्थ झाले होते, त्यामुळे त्यांनी गणपती बाप्पालाच स्वेटर, कानटोपर घालून दिले. एवढेच नाही तर भाविकांनी बाप्पाला शॉलसुद्धा पांघरून दिली.
हेही वाचा - Nagpur Weather Update : नागपूरच्या तापमानात आजही घसरण, सात जिल्ह्यांचे तापमान १० डिग्रीखाली
थंडीची तीव्रता दिवसेंदिवस वाढणार असल्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. सध्या नागपूरचे तापमान 7 डिग्रीच्या अवतीभवती फिरत असल्यामुळे भक्तांनी नागपुरातील प्रसिद्ध तात्या टोपे नगर येथील गणेश मंदिरातील गणपती बाप्पाचे थंडीपासून रक्षण करण्यासाठी त्यांना उबदार कपडे घालून दिले आहेत. एवढेच नाही तर, गाभाऱ्यातील वातावरण उबदार राहावे याकरिता एकाच वेळी चार दिवे देखील तेवत ठेवण्यात आले आहेत. कुठल्याही परिस्थितीत बाप्पाला थंडी वाजणार नाही याची दक्षता बाप्पांच्या भक्तांनी घेतली आहे.
प्राणप्रतिष्ठापनेनंतर मूर्ती होते सजीव - भक्तांची भावना
ज्यावेळी एखाद्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना केली जाते, त्यावेळी त्या मूर्तीमध्येसुद्धा प्राण येतात, अशी बाप्पाच्या भक्तांची भावना आहे. ज्यांच्यात प्राण आहेत, त्यांना थंडी जाणवते तेव्हा बापाच्या मूर्तीतही प्राण असल्याने त्यांना देखील थंडी वाजत असेल, अशी तीव्र भावना भक्तांची असल्याने बाप्पाला स्वेटर, कानटोपरे घातल्यानंतर शॉलची ऊब दिल्याची भावना भक्तांनी व्यक्त केली. गेल्या अनेक वर्षांपासून या मंदिरात हा नित्यक्रम पाळला जात आहे.
ऋतूनुसार केली जाते बाप्पाची सोय -
ज्याप्रमाणे थंडीत बाप्पाला स्वेटर, मफलर, शॉलची ऊब दिली जाते, त्याचप्रमाणे उन्हाळ्यात बाप्पासाठी भक्त कुलरची व्यवस्था करतात.
हेही वाचा - Cut Hair With 20 Scissors : तब्बल 20 कात्र्यांनी कापले केस, स्वतःचाच मोडला रेकॉर्ड