नागपूर - नागपुरात अजब गजब घटना उघडकीस आली आहे. यात चोरट्यांनी चक्क थंडीपासून बचाव म्हणून चोरीची दुचाकी पेटवून शेकोटी केली आहे. त्यामुळे, चोरटे कशा पद्धतीने सर्वसामान्य माणसाच्या घामाचा पैशांवर मौज करतात हेच या घटनेतून यशोधरा नगर पोलिसांच्या तपासात उघडकीस आले आहे. तसेच, याच टोळीतील पाचव्या फरार आरोपीने पोलिसांना इमोशनल करण्यासाठी व्हिडिओ पाठवला आहे. काय आहे नेमका प्रकार? जाणून घेऊ या विशेष वृत्तातून.
हेही वाचा - Agricultural Laws : कृषी मंत्र्यांच्या विधानावरून कृषी कायद्यांबाबत पुन्हा संभ्रम
नागपूरच्या यशोधरा नगर पोलिसांच्या हद्दीत काही चोरटे हे दरोडा टाकण्याच्या बेतात होते. पण, याची माहिती यशोधरा नगरचे पोलीस निरीक्षक संजय जाधव यांना मिळाली. त्यांनी सापळा लावून या चोरट्यांचा दरोड्याचा बेत उधळून लावला. शिवाय चौघांना अटक करत 10 दुचाकी जप्त केली असून, पाचव्या आरोपीला अटक करण्याचा प्रयत्न सुरू आहे.
चौघांना ताब्यात घेत तपास सुरू करण्यात आला. पोलिसी खाक्या दाखवण्यात आला तेव्हा आरोपींनी 10 दुचाकी चोरल्याची कबुली दिली. पण, जप्तीच्या कारवाईत नऊ दुचाकीच मिळाल्या. तेव्हा दहावी दुचाकी कुठे आहे? असा प्रश्न टोळीचा म्होरक्या छोटा सरफराजला विचारण्यात आला. पण, त्याचा कारनामा ऐकून पोलीस चक्रावले. कारण या छोट्या सरफराजने फरारीत असताना रात्री ज्या शेतात लपून होता तिथे थंडी लागत असल्याने चक्क बाईक जाळून शेकोटी केली असल्याचे पोलिसांच्या तपासात सांगितले आहे. चोरटे सर्वसामान्य नागरिकांच्या कष्टाने कमावलेल्या वस्तू चोरून त्याची कवडीमोल भावात विक्री करतात. पण, तीच वस्तू सामान्य माणसाला घेण्यासाठी काय त्रास सोसवा लागला असले, याचा विचारही ते करत नाही. हे या घटनेतून स्पष्ट होते.
याच टोळीतील फरार असलेल्या पाचव्या आरोपीने पोलिसांना इमोशनल करण्याचा फंडाही शोधला. अर्धा डजनपेक्षा जास्त गुन्हे दाखल असून फरारीत निर्जनस्थळी पोलीस पकडू नये म्हणून लपून बसला आहे. पण, या सय्यद असिफ सय्यद निजाम उर्फ भुऱ्याने व्हिडिओ करून वाईट परिस्थिती असल्याचे सांगितले. त्याने व्हिडिओ पाठवून कशा पद्धतीने तो राहत आहे हे सांगण्यासाठी 'ये देखो मेरी लाईफ, क्या जिंदगी हो गइ है' असे सांगत व्हिडिओ रेकॉर्ड केला आहे. यात भुऱ्याने केसांवर हात फिरवून ना खायला काही आणि राहायला छत अशी अवस्था सांगून पोलिसांना इमोशनल करण्याचा प्रयत्न केला आहे. या चोरट्याचा यशोधरा नगर पोलीस शोध घेत असून त्यास लवकरच अटक करू, असेही त्यांनी सांगितले आहे.