नागपूर - उत्तर प्रदेशच्या योगी सरकारच्या लोकसंख्या धोरणावर बोलताना राज्याचे विरोधीपक्ष नेते म्हणाले की, ज्या राज्यात मोठ्या प्रमाणात लोकसंख्या वाढीचा विस्फोट आहे, त्या राज्यात लोकसंख्या नियंत्रण करण्यासाठी कायदा असणे गरजेचे आहे. एवढेच काय गरज पडल्यास देशासाठी सुद्धा कायदा व्हावा, असेही विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस म्हणाले. ते नागपुरात एका कर्यक्रमानंतर प्रसार माध्यमांशी बोलत होते.
कायदा लागू केल्यास नक्कीच याचा फायदा होईल -
भारतात चीनप्रमाणे वन किंवा नन म्हणजेच एक किंवा शून्य (काहीच नाही) असे करायचे नाही. पण लोकसंख्या नियंत्रणात असणे गरजेचे आहे. आपण लोकशाही देशात राहतो. देशातील लोकसंख्या वाढीला रोखण्यासाठी प्रोत्साहन म्हणून कायदा लागू केल्यास नक्कीच याचा फायदा होईल असेही देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले.
एक मुल झाल्यानंतर नसबंदी केल्यास त्यांना 20 वर्षापर्यंत मोफत आरोग्य सुविधा -
उत्तर प्रदेशमध्ये मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ सरकारने जागतिक लोकसंख्या दिनाचे औचित्य साधत लोकसंख्या धोरण जाहीर केले. यामध्ये परिवार नियोजन करण्यासह अनेक योजना राबाविण्याचा विचार सुरू असून एक मुल झाल्यानंतर नसबंदी केल्यास त्यांना 20 वर्षापर्यंत मोफत आरोग्य सुविधा, शिक्षण, विमा, यासोबत शासकीय नोकरित प्राधान्य असे अनेक लाभ या लोकसंख्या धोरणाच्या माध्यमातून देणार असल्याचे या धोरणात म्हटले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसंख्या स्फोटाबाबत व्यक्त केली होती काळजी -
संयुक्त राष्ट्रसंघाच्या अहवालानुसार, भारत हा जगातील दुसऱ्या क्रमांकाचा लोकसंख्या असलेला देश असून २०२७ पर्यंत चीनला मागे टाकून यादीत पहिला असेल. १५ ऑगस्ट १५ रोजी, लाल किल्ल्यावरून भाषण करताना पंतप्रधान मोदी यांनी सध्याच्या आणि भावी पिढ्यांसाठी समस्या तयार करणाऱ्या लोकसंख्या स्फोटाबद्दल काळजी व्यक्त केली होती. लहान परिवार देशाच्या अधिक कल्याणासाठी सहाय्य करत असल्याने त्यांच्याबाबतीत काही समस्या नाही, अशा शब्दांत मोदींनी प्रशंसा केली होती.
हेही वाचा - सिंधुदुर्गात वेगळ्या राजकारणाची नांदी.. शिवसेना नेते, नितेश राणे अन् भाजपातील राणे समर्थक एकाच व्यासपीठावर