नागपूर - भाजपमधील अंतर्गतवाद आता चव्हाट्यावर येताना दिसत आहे. भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी भाजपच्या नेत्यांवर जाहीर टीका केली होती. त्याला प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांनी जोरदार उत्तर दिले. यादरम्यान पक्षातील नाराजांमध्ये नाव घेतले जाते असे भाजपचे ज्येष्ठ नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी मात्र आपण नाराज नसल्याचे म्हटले आहे. 'मी विधानपरिषदेचे तिकीट मागितले नव्हते. मात्र, माझे नाव चर्चेत असल्याचे मला टीव्हीवर समजले. मागील 28 वर्षांपासून भाजपमध्ये काम करत आहे. पक्ष सोडण्याचा विचार माझ्या डोक्यातही नाही' असे भाजपचे ज्येष्ठ नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटले आहे.
हेही वाचा... 'आत्मनिर्भर भारत पॅकेज' सोप्या भाषेत....भाग - १
विधानपरिषद निवडणुकीत यावेळी भारतीय जनता पक्षाने नवख्या नेत्यांना संधी दिली. त्यामुळे पक्षातील जेष्ठ नेत्यांमध्ये नाराजीचा सूर असल्याची चर्चा दबक्या आवाजात सुरू झाली होती. एकनाथ खडसे यांनी याबाबत उघडपणे नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर भाजपचे ज्येष्ठ नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी आता आपले मत व्यक्त केले आहे.
पक्ष बदलण्याचा कोणताही विचार सध्या डोक्यात नाही...
विधान परिषदेसाठी मी कधीही तिकीट मागितले नव्हते. त्यामुळे माझे तिकीट कापले, असे म्हणणे चुकीचे आहे. प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी जरी माझ्यावर अन्याय झाल्याचे मत व्यक्त केले असले, तरिही विधानसभा निवडणुकीत 32 विधानसभा जागांच्या प्रचाराची जबाबदारी माझ्याकडे दिली होती. त्यामुळे भविष्यात देखील पक्ष जी जबाबदारी देईल, ती मी पूर्णपणे पार पडणार असल्याचे, बावनकुळे यांनी म्हटले आहे.