नागपूर - गेल्या काही महिन्यांपासून राज्यात बनावट क्रीडा प्रमाणपत्रावर शासकीय नोकऱ्या लाटण्याचे प्रकरण चांगलेच गाजत आहे. सुरवातीला अशा लोकांवर कारवाई झाल्यानंतर आता हे प्रकरण थंड होते की काय असे दिसत होते. यावर राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे. बोगस क्रीडा प्रमाणपत्र प्रकरणी कारवाई सुरू असून दोषींवर कडक कारवाई करण्यासंदर्भात कार्यवाही सुरू झाल्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सांगितले आहे.
हेही वाचा - निराधार प्राण्यांची माय अंधारात; भरमसाट बिलाने लाईट लावण्याचीही आजींना भीती
बोगस क्रीडा प्रमाणपत्र प्रकरणी नागपूर पोलिसांनी आतापर्यंत ८ जणांना अटक केली आहे. यामध्ये बनावट क्रीडा प्रमाणपत्राच्या आधारे बोगस खेळाडू आणि शासकीय नोकरी लाटणारे आहेत. औरंगाबाद, सांगली, नागपूरसह अनेक ठिकाणी या प्रकरणी कारवाई झालीय. पोलिसांनी कारवाई सुरू केल्यानंतर औरंगाबाद येथे बोगस क्रीडा प्रमाणपत्र प्रकरणी ३०० तक्रारी आल्याचेही गृहमंत्र्यांनी सांगितले आहे.
या प्रकरणी आणखी बडे मासे अडकणार
बोगस क्रीडा प्रमाणपत्र प्रकरणात नागपूरसह सांगली आणि औरंगाबाद या मोठ्या शहरातून बोगस लाभार्थ्यांना पोलिसांनी अटक केलेली आहे. ३५ पेक्षा जास्त लोकांनी अशा प्रकारे नोकऱ्या लाटल्याची माहिती पुढे आली असून आणखी मोठे अधिकारी आणि कर्मचारी या प्रकरणात अडकण्याची शक्यता निर्माण झाली आहे. अशा परिस्थितीत आता थेट गृहमंत्री अनिल देशमुख यांनी इशारा दिल्यामुळे अशा लोकांचे धाबे दणाणले आहे.
हेही वाचा - महाविकास आघाडीचे सरकार आपोआप पडेल - प्रवीण दरेकर