नागपूर - पूजा चव्हाण आत्महत्येमागील सत्य काय आहे ते पोलीस लवकर समोर आणतील. पोलिसांवर कोणाचाही दबाव नाही. तसेच विरोधी पक्षाच्या आरोपात काहीही तथ्य नसल्याचे गृहमंत्री अनिल देशमुख म्हणाले. ते नागपुरात बोलत होते. पूजा चव्हाण प्रकरणात नियमानुसार रितसर चौकशी होणार आहे. चौकशीतून जे काही समोर येईल त्यानुसार राज्य सरकार पुढे निर्णय घेईल, असेही गृहमंत्री यांनी सांगितले.
चौकशी होणार असल्याची मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया -
नियमानुसार चौकशी होणार असल्याचे याआधीच मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे. पुणे पोलीस नियमानुसार चांगले काम करत चौकशी करत आहे. चौकशी पूर्ण झाल्यावर जे काही सत्य आहे ते बाहेर येईल, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले होते.
संजय राठोड यांचं नाव घेणं टाळलं
प्रकरणाची नियमानुसार चौकशी सुरू आहे. चौकशीनंतर सत्य समोर येईल. दरम्यान, संजय राठोड यांची चौकशी होणार का? यावर मात्र गृहमंत्र्यांनी बोलणे टाळले आहे. संजय राठोड कुठे आहेत असे विचारले असता, हा त्यांचा वैयक्तीक प्रश्न असल्याचेही गृहमंत्री अनिल देशमुख म्हणाले. एकदा संपूर्ण चौकशी पूर्ण झाल्यावर राज्य सरकार पुढचा निर्णय घेईल, असेही ते म्हणाले.
गृहमंत्री होम क्वारंटाईनमध्ये -
गृहमंत्री यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना नागपुरातील कोराडी मार्गावरील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. यानंतर जवळपास 12 दिवसांच्या उपचारानंतर त्यांची प्रकृती चांगली झाली आहे. ते कोरोनामुक्त झाले असून, पुढील आठ दिवस त्यांना होम क्वारंटाईनमध्ये राहण्यास डॉक्टरांनी सांगितले आहे.
हेही वाचा - ग्रेटा थनबर्ग टूलकिट प्रकरण : निकिता जेकब यांच्या अटकपूर्व जामिनावर मंगळवारी सुनावणी
हेही वाचा - महाराष्ट्रात पुढील दोन दिवस अवकाळी पावसाची शक्यता