नागपूर - विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या कार्यकर्त्यांनी नागपूरच्या इतवारी परिसरातील शाहीद चौकात नागपूर कराराची होळी करण्यात आली आहे. विदर्भ राज्याचा महाराष्ट्रात समावेश करण्यासाठी १९५३ साली झालेल्या नागपूर कराराला आज ६८ वर्ष पूर्ण झाली आहेत. या ६८ वर्षांच्या काळात सत्तेवर आलेल्या प्रत्येक पक्षांनी विदर्भाच्या वाट्याला येणारा विकास पश्चिम महाराष्ट्रात पळवल्याचा आरोप सातत्याने केला जात आहे. नागपूर करारांतर्गत खोटे आश्वासन देऊन इच्छा नसताना विदर्भाला महाराष्ट्रात सामील करण्यात आले, या विरोधात आज विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या कार्यकर्त्यांनी नागपूर कराराची होळी करत आंदोलन केले आहे. या ६८ वर्षांच्या काळात कधीही नागपूर कराराचे पालन झाले नाही. त्यामुळे विदर्भाचे मागासलेपण वाढतच गेले आहे. एवढंच नाही तर कोट्यवधी रुपयांचा अनुशेष तयार झाला असल्याचा आरोप विदर्भवाद्यांनी केला आहे.
हे ही वाचा - 'तुका म्हणे येथे भजन प्रमाण' चिंतन मांडत असतानाच किर्तनकाराचे देहावसान
महाराष्ट्रात सामील होण्यासाठी 28 सप्टेंबर 1953 रोजी नागपूर येथे महाराष्ट्र व विदर्भातील नेत्यांमध्ये करार झाला होता. याला नागपूर करार म्हणून मान्यता आहे. या करारानुसार मध्यप्रदेशात असलेल्या विदर्भाने महाराष्ट्रात सामील होण्याची संमती दिली होती. या करारावर यशवंतराव चव्हाण, भाऊसाहेब हिरे, नाना कुंटे यांच्यासह विदर्भातील रा. कृ. पाटील, रामराव देशमुख, लक्ष्मणराव भटकर यांच्या स्वाक्षऱ्या होत्या.