नागपूर - शहरात आज सूर्य जणू आग ओकत असल्याचा अनुभव नागपूरकरांनी घेतला. आज नागपूरचे तापमान 47.5 अंश सेल्सिअस इतके नोंदवण्यात आले आहे. सकाळपासूनच तापमानाचा पारा भडकलेला असल्याने घरातच अंगाची लाही लाही होत होती. त्यामुळे घराबाहेर पडण्याचा विचारही केला जात नव्हता. या उन्हाळ्यातील हा उच्चांक आहे.
नागपुरात आतापर्यंत 2013 मध्ये सर्वाधिक म्हणजेच 47.9 एवढ्या तापमानाची नोंद झाली आहे. दुपारी घराबाहेर पडणे अशक्य झाले आहे. अक्षरशः अंग भाजून काढणारे उन सध्या नागपुरात आहे. उन्हामुळे रस्त्यावरील डांबर वितळत आहे. उत्तरेकडून येणाऱ्या उष्ण वाऱ्यामुळे सध्या नागपूरचे तापमान वाढले आहे. त्यात हवेतील आद्रता कमी झाल्याने उकाडा वाढला आहे. आणखी काही दिवस तापमान 46 अंशावर राहणार असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला.