नागपूर - विदर्भात यंदा मार्च महिन्याच्या सुरुवातीला उन्हाचे चटके लागायला लागले आहेत. विदर्भातील सर्वच शहरांचे तापमान सरासरीपेक्षा जास्त आहे. पुढील दोन दिवस तर अकोला आणि चंद्रपूर जिल्ह्यात उष्णतेची लाट राहणार असल्याचा इशारा नागपूर प्रादेशिक हवामान विभागाने दिला आहे. त्यामुळे यंदाचा उन्हाळा विदर्भ वासीयांना जड जाणार असे दिसत आहे.
यंदाचा उन्हाळा चांगलाच तापण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. त्यामुळे विदर्भातील नागरिकांना कोरोना आणि कडक उन्ह या दोन्हीचा सामना करावा लागणार आहे. त्यामुळे नागरिकांना विशेष काळजी घेण्याची गरज आहे. मे महिन्यात तर उन्हाचा पारा ४८, ४९ अंश सेल्सिअस पर्यंत जातो. त्यामुळे इतर शहरातील नागरिक नागपुरात येण्याचे धाडस करत नाहीत. विदर्भातील उन्हाळा म्हणजे जणू अग्नी परीक्षाच असे समीकरण तयार झाले आहे. विदर्भातील कडक उन्हामुळे दुपारी घराबाहेर पडणे कठीण होते. यंदा तर मार्च महिन्यातच उन तापायला लागल आहे. साधारणतः मार्च महिन्याच्या शेवटी विदर्भातील पारा 40 अंश सेल्सिअस पर्यंत पोहचतो. मात्र, यंदा पहिल्या आढवड्यातच पारा 40 पर्यंत पोहचला आहे. अकोला आणि चंद्रपूर जिल्ह्यात तर उष्णतेची लाट येणार असल्याची इशारा हवामान खात्याने दिला आहे.
आरोग्य सांभाळा -
एकीकडे विदर्भात कोरोनाचा उद्रेक झाला असताना आता तापमान प्रचंड वाढू लागल्याने आरोग्याच्या समस्या निर्माण होऊ लागल्या आहेत. तापमान वाढल्यामुळे नागरिकांना आरोग्याची काळजी घ्यावी लागणार आहे. विशेषतः लहान मुले आणि जेष्ठ नागरिकांना उन्हाचा अधिक त्रास होतो. नागरिकांनी भरपूर पाणी पिण्याचे आवाहन डॉक्टरांकडून केले जात आहे.