नागपूर - कोरोनाची परिस्थिती नागपुरात हाताबाहेर गेल्याचे चित्र सध्या दिसत आहे. काल (गुरुवार) एकाच दिवशी जिल्ह्यात २५ कोरोना रुग्णांचा मृत्यू झाल्यानंतर प्रशासनाला खडबडून जाग आली आहे. आज (शुक्रवार) नागपूरचे पालकमंत्री नितीन राऊत यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत जिल्ह्यातील कोरोनाच्या परिस्थितीचा आढावा घेण्यात आला.
जनतेत कोरोनाची भीती असल्याने भीतीपोटी कोरोनाचे लक्षण असलेले अनेक रुग्ण योग्य वेळी पुढे येत नाहीत. त्यामुळे नागपुरातील कोरोना मृत्यूची संख्या झपाट्याने वाढत असल्याचा दावा पालकमंत्री नितीन राऊत यांनी केला आहे. सोबतच शासनाने जारी केलेल्या नियमावलीचे पालन केले, तर संसर्ग नियंत्रणात आणता येण्याची शक्यता देखील व्यक्त केली आहे.
हेही वाचा - एकनाथ खडसेंना 'महावितरण'चा झटका; पाठवले 1 लाख 4 हजारांचे वीजबिल
नागपूरमध्ये कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूचे प्रमाण वाढले आहे. काल (गुरुवार) दोन पोलीस कर्मचाऱ्यांच्या देखील मृत्यू झाल्यानंतर फ्रंट लायनर वॉरअर असलेल्या पोलीस दलात सुद्धा कोरोनाचा प्रादुर्भाव वाढीस लागल्याचे चित्र पुढे येत आहे. नागपूर जिल्ह्यात कोरोनामुळे आजवर २०३ रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. त्यापैकी 188 मृत्यू हे एकट्या नागपूर जिल्ह्यातील आहेत तर उर्वरित मृत्यू हे इतर शहरातून आणि राज्यातुन नागपूरमध्ये उपचाराकरिता आलेल्या रुग्णांचे आहेत.
सर्वात महत्वाचे म्हणजे गेल्या चार महिन्यात नागपुरात केवळ शंभर रुग्णांचा मृत्यू झाले होता. मात्र, मागील सात दिवसात आणखी शंभर रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. त्यामुळे कोरोनाचा धोका किती वाढलेला आहे. याचा अंदाज घेऊन पालकमंत्री नितीन राऊत यांनी आज आढावा बैठक बोलावली होती.