नागपूर : महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटनेच्या नेतृत्वात खासगीकरण विरोधात आणि आपल्या विविध मागण्यांकडे राज्य सरकारचे लक्ष वेधण्यासाठी परिचारिकांच्या संघटनेने 28 पासून कामबंद आंदोलन सुरू केलं आहे. त्यामुळे नागपुरातील आरोग्य व्यवस्थेवर परिणाम झाला आहे. राज्य परिचारिका संघटनेकडून कामबंदची हाक देण्यात आली असल्याने मेयो आणि मेडिकल रुग्णालयातील अनेक आवश्यक शस्त्रक्रिया पुढे ढकलण्यात आल्या आहेत. (Mayo Hospital cancels surgery)
अनेक शस्त्रक्रिया रद्द : नागपूरच्या मेयो आणि मेडिकल रुग्णालयातील अनेक शस्त्रक्रिया पुढे ढकलण्यात आल्या आहेत. रुग्णांचे हाल होत असल्याचे चित्र रुग्णालयात पाहायला मिळत आहेत. अनेक रुग्णांना बरे होण्याआधीच सुटीदेखील दिली जात आहे. परिचारिकांच्या आंदोलनावर शासनाने त्वरित तोडगा काढावा, अशी मागणी केली जात आहे. सुरुवातीला परिचारिकांच्या संघटनेने 24 आणि 25 मे रोजी एक तास आंदोलन केलं होतं. त्यानंतर 26 आणि 27 मे रोजी दिवसभर काम बंद ठेवूनही शासनाने लक्ष दिले नसल्याने अखेर महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटनेने 28 पासून बेमुदत संप पुकारला आहे.
काय आहेत मागण्या : 100 टक्के कायमस्वरूपी पदभरती करण्यात यावी. परिचारिका भरती प्रक्रियेत सुरू असलेले खासगीकरण बंद करण्यात यावे. केंद्र सरकारच्या नियमानुसार 7 हजार दोनशे रुपये वेतनवाढ देण्यात यावी. गणवेश भत्ता देण्यात यावा. कोरोनाच्या काळात 300 तीनशे अर्जित रजा देण्यात याव्यात. प्रशासकीय बदली न करता विनंती बदली देण्यात द्यावी, विद्यार्थी परिचारिकांना विद्यावेतन देण्यात यावे, स्टाफ नर्स हे पदनाम बदलून, नर्सिंग ऑफिसर असे करण्यात यावे, अशी मागणी महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटनेकडून करण्यात येत आहे.
हेही वाचा : परिचारिकांचे आजपासून बेमुदत संप, आरोग्यव्यवसथा कोलमडण्याची शक्यता