नागपूर - उधारी पैशाच्या वादातून गुंडाने साथीदाराच्या मदतीने अपहरण करून माराहाण करत एका युवकाला पेट्रोल पंपावरच जाळण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना शांतीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे. याप्रकरणी पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली आहे. पेट्रोलपंपावर युवकाला मारहाण आणि धमकी देत अंगावर पेट्रोल टाकण्याच्या प्रयत्नाची घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. या प्रकरणी शांतीनगर पोलिसांनी कुख्यात गुंड सागर यादव आणि त्याचा साथीदार रजत राऊत यांना अटक केली आहे.
भावेश भागवानी याचा मित्र मोहित देवानी याने सागरकडून पैसे उधार घेतले होते. नंतर मोहित सागरला पैसे देण्यास टाळाटाळ करत असल्याने रविवारी सकाळी मोहितचा मित्र भावेश छाप्रूनगर येथे क्रिकेट खेळायला जात असताना गुंड सागर यादव आणि त्याचा साथीदार रजत राऊत या दोघांनी भावेश याला अडवले. मोटारसायकलवर बसवले. त्यानंतर भावेशला मोहितच्या मोबाईलवर संपर्क साधण्यासाठी धमकावले.
दरम्यान, दोघेही भावेश याला शांतीनगरमधील पेट्रोलपंपावर घेऊन गेले. तेथे भावेश याला पुन्हा मारहाण केली. पंपावरील पाईपमधून सागर याने भावेश याच्या अंगावर पेट्रोल टाकून जाळण्याची धमकी दिली. सुदैवाने तिथे काही जण धावल्यामुळे भावेशचा जीव वाचला. पेट्रोलपंपावरील हे सर्व धुडघुस सीसीटीव्हीत चित्रित झाली आहे.
दरम्यान, शांतीनगर पोलिसांनी गुन्हा दाखल करून सागर व त्याच्या साथीदाराला याप्रकरणी अटक केली. धक्कादायक म्हणजे पेट्रोलपंपासारख्या वर्दळीच्या ठिकाणीही धमकी आणि मारहाणीच्या घटनेमुळे नागपुरात गुंडगिरी किती बेफाम झाली आहे हे पुन्हा एकदा समोर आले आहे.