अमरावती Aamzari Tourism Complex : मेळघाटातील चिखलदराजवळील वन्यजीव विभागाच्या आमझरी पर्यटन केंद्रात आता साहसी खेळांचा थरार पर्यटकांना अधिक प्रमाणात उपलब्ध होणार आहे. गेल्या काही वर्षांपासून पर्यटकांना आकर्षित करणाऱ्या आमझरीला आता थरारक खेळांनी भुरळ घातली आहे. आमझरी येथे पर्यटकांना थरार अनुभवता येत असतानाच पर्यटकांच्या आनंदातून या परिसरातील आदिवासी युवकांना रोजगारही उपलब्ध झालाय.
असं आहे आमझरी पर्यटन केंद्र : चिखलदरा विदर्भाचं 'नंदनवन' म्हणून ओळखलं जातं. चारही बाजूंनी डोंगरांनी वेढलेला आणि चिखलदऱ्यापासून अवघ्या सहा किलोमीटर अंतरावर खोल दरीत वसलेला आमझरी गावाजवळचा परिसर वन्यजीव विभागानं विकसित केलाय. ऑक्टोबर 2021 मध्ये, सातपुडा एडवेंचर ग्रुपच्या माध्यमातून आमझरी येथं झिप लाईन, बंजी इरेक्शन यासारखे साहसी खेळ सुरू करण्यात आले. या ठिकाणी बॅटरीवर चालणाऱ्या सायकली पर्यटकांमध्ये खूप लोकप्रिय आहेत. या ठिकाणापासून 20 किमी अंतरावर जंगल सफारीची सुविधाही पर्यटकांसाठी उपलब्ध आहे. आमझरी टुरिस्ट कॉम्प्लेक्समध्ये पर्यटकांसाठी राहण्याची सोयही आहे.
आमझरीत नव्यानं वाढला थरार : बंजी इरेक्शन आणि झिप लाईन यांसारख्या थरारक खेळांसोबतच आमझरी येथे आणखी साहसी खेळांची व्यवस्था करण्यात आली आहे. 200 मीटर झिप लाईन आता 450 मीटरची करण्यात आली. यामध्ये 210 मीटर उंच डोंगरावरून नदी ओलांडून जाणं आणि 240 मीटर परत येणं समाविष्ट आहे. झिपलाईन सोबतच स्काय सायकल हा प्रकार देखील हृदयाचे ठोके वाढवणारा आहे. आमझरी टुरिस्ट संकुल ते मेंढादेव धबधबा असा साडेतीन किलोमीटरचा निसर्ग मार्गही विकसित करण्यात आला आहे.
पर्यटकांना द्यावं लागतं संमती पत्र : हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंड राज्यांप्रमाणेच पर्यटक अमझरी पर्यटन केंद्रात साहसी खेळांचा आनंद घेऊ शकतात. या साहसी खेळांचा आनंद घेण्यापूर्वी पर्यटकांना आम्ही स्वतःच्या मर्जीनं साहसी क्रीडा प्रकार खेळत आहोत, असं संमतीपत्र द्यावं लागतं.
आदिवासी युवकांना मिळाला रोजगार : आमझरी पर्यटन केंद्रात साहसी खेळांचा आनंद घेण्यासाठी विदर्भातील अनेक पर्यटक मेळघाटला भेट देतात. आमझरी येथील पर्यटकांची संख्या आता चांगलीच वाढली असून आमझरी गावातील एकूण 18 युवकांना पर्यटन संकुलाच्या माध्यमातून रोजगार उपलब्ध झाला. हे सर्व तरुण साहसी खेळांसंदर्भात प्रशिक्षित असून ते महिन्याला दहा ते बारा हजार रुपये कमावतात. पूर्वी या ठिकाणी आठ ते दहा युवक होते. मात्र, आता नवीन साहसी खेळांमुळं 18 तरुणांना त्यांच्या गावात रोजगार मिळालाय. पर्यटकांची संख्या वाढल्यास आमच्या गावातील तरुणांना अधिकाधिक रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील, असं आमझरी पर्यटन संकुलातील रोजंदारीवर काम करणारे सुखदेव हेगडे यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना सांगितलं.
मेळघाटात वाढली पर्यटकांची संख्या : गेल्या पाच वर्षांत मेळघाटात पर्यटकांची संख्या वाढली आहे. चिखलदरा, सेमाडोह, कोलकाससह आमझरी पर्यटन संकुल पर्यटकांचं विशेष आकर्षण ठरलं आहे. 2017-18 मध्ये 54 हजार 500 पर्यटकांनी मेळघाट व्याघ्र प्रकल्पाला भेट देऊन एकूण 71.81 लाख रुपयांची कमाई केली. 2022-23 मध्ये पर्यटकांची संख्या एक लाख 67 हजार झाली. 2022 मध्ये पर्यटकांच्या माध्यमातून 3.20 कोटी रुपयांहून अधिक कमाई झाली. चिखलदरा येथील भीमकुंड येथे पर्यटकांना दरीच्या काठावरून उंच झोक्याचा थरारही अनुभवायला मिळणार आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत भीम कुंड पॉइंट येथील साहसी खेळांचं लोकार्पण करण्यात आलं, असं परतवाडा येथील उपवनसंरक्षक यशवंत बहाळे यांनी सांगितलं.
हेही वाचा