नागपूर - राज्यात कोरोनाचे संकट आणखी गडद होत आहे. त्यामुळे राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल रात्री ८ वाजल्यापासून कडक निर्बंधांसह लॉकडाऊन लावला आहे. आजच्या स्थितीत उपराजधानी नागपुरातील कोरोनाची परिस्थिती अतिशय गंभीर झाली आहे. त्यामुळे लॉकडाऊनची अंमलबजावणी अत्यंत प्रभावीपणे केली जात असल्याची माहिती शहर पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी दिली आहे. याकाळात विनाकारण रस्त्यांवर फिरणाऱ्या बेजबाबदार नागरिकांवर कारवाई केली जाणार असल्याचीही माहिती त्यांनी दिली आहे.
शहर पोलीस आयुक्त अमितेशकुमार लॉकडाऊनला नागपुरकरांचा चांगला प्रतिसाद'ब्रेक द चेन' अंतर्गत संपूर्ण महाराष्ट्रात बुधवारी रात्री आठ वाजल्यापासून संचारबंदी लागू करण्यात आली आहे. त्या पार्श्वभूमीवर नागपूर पोलिसांनी नियम तोडणाऱ्यांवर कारवाई करायला सुरुवात केली आहे. लॉकडाऊनच्या पहिल्याच दिवशी नागपूरकरांनी चांगला प्रतिसाद दिल्याचे बघायला मिळत आहे. शहरातील सर्व बाजारपेठांसह दुकाने आणि मॉल बंद आहेत. संचारबंदी लागू होताच मुख्य रस्त्यांवरील वर्दळ पूर्णपणे कमी झालेली आहे. नागपूर पोलिसांनी प्रत्येक रस्त्यावर आणि चौकात मोठा बंदोबस्त तैनात केलाय. शहरात कोरोनाची परिस्थिती नियंत्रणात यावी याकरिता पोलीस विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी देखील गेल्या काही दिवसांपासून बेजबाबदार नागरिकांवर कारवाई करत असल्याचे दिसून येत आहे. आज पहिला दिवस असल्याने फारसी सक्ती करण्यात आलेली नसली, तरी पुढील काळात संचारबंदीची कडक अंमलबजावणी केली जाणार आहे.
शहरात ६० ठिकाणी बंदोबस्तशहरात पोलिसांचा तगडा बंदोबस्त तैनात केला जाणार आहे. प्रत्येक चौकात पोलिसांकडून बेजबाबदार नागरिकांवर कारवाई केली जाणार आहे. त्यामुळे शहरात तब्बल ६० ठिकाणी नाका बंदी लावण्यात आल्याची माहिती पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी दिलेली आहे.
हेही वाचा - देशांतर्गत विमान प्रवासात आजपासून खानपान सुविधा बंद