नागपूर - ४१ वर्षीय स्कुल बस कंडक्टर दीपा दास हत्या ( Women School Carrier Murder ) प्रकरणाने वेगळे वळण घेतले आहे. मैत्रिणीला उधार दिलेले एक लाख रुपये मागितल्यामुळे संतापलेल्या मैत्रीणीनेच नवऱ्याच्या मदतीने दीपाचा गळा आवळून हत्या केल्याचा खुलासा नागपूर पोलिसांनी केला आहे. या प्रकरणी कपिल नगर पोलिसांनी दीपाची मैत्रीण सोनम सोनी आणि तिचा नवरा सनी सोनी यांना अटक करण्यात आली आहे.
खाक्या दाखवताच केला गुन्हा कबूल - दीपा जुगल दास ही महिला शनिवारी दुपारपासून बेपत्ता झाली होती. रविवारी सकाळी कपिलनगर मधील एका निर्जनस्थळी एका प्लास्टिक बॅगमध्ये दीपाचा मृतदेह आढळून आला होता. दीपा यांचा मृतदेहावर शाळेचा युनिफॉर्म असल्याने मृतदेहाची ओळख तात्काळ पटली होती. त्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला असता बेपत्ता होण्यापूर्वी दीपा ही सोनम सोनी नावाच्या मैत्रिणीकडे गेली होती, अशी माहिती पोलिसांना समजली. त्याआधारे पोलिसांनी सोनम आणि तिचा नवरा सनी यांना चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. सुरुवातीला दोघेही उडवा-उडवीचे उत्तर देत असल्याने पोलिसांना त्यांच्यावर संशय बळावला होता. पोलिसांनी पोलिसी खाक्या दाखवताचे दोघांनी आपला गुन्हा कबूल केला आहे.
१ लाख रुपायांसाठी दिपाची हत्या - शनिवारी ड्यूटी पूर्ण केल्यानंतर दीपा आपले एक लाख रुपये मागण्यासाठी सोनम सोनी यांच्या घरी गेली होती. त्यावेळी सोनम आणि दीपामध्ये जोरदार भांडण झाले, त्यामुळे संतापलेल्या सोनम आणि तिच्या नवऱ्याने दीपाची गळा आवळून हत्या केली. दिपच्या हत्येची माहिती लपवण्यासाठी रात्री दोन्ही आरोपींनी मिळून मृतदेह प्लास्टिकच्या बॅग मध्ये भरून निर्जन स्थळी फेकून दिला होता.