नागपूर - केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून वर्धा येथील जेनेटिक लाईफ सायन्स या कंपनीने एम्फोटेरिसिन बी इमल्शन या इंजेक्शनची निर्मिती सुरू केली आहे. सध्या धोकादायक ठरत असलेल्या म्युकरमायकोसिस या आजारावर उपचार करण्यासाठी या इंजेक्शनचा वापर केला जातो. सोमवारपासून कंपनीकडून या इंजेक्शनचा पुरवठा सुरू होणार असल्याचे कंपनीकडून सांगण्यात आले आहे.
राज्यात सध्या ब्लॅक फंगस या बुरशीचा संसर्गजन्य आजाराचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढला आहे. त्यावर एम्फोटेरिसिन बी इमल्शन हे इंजेक्शन परिणाम कारक उपचार ठरत आहे. मात्र, रुग्णसंख्या वाढत असताना या इंजेक्शनचा तुडवडा वाढत होता. कारण महाराष्ट्रात केवळ अंबरनाथमध्ये या इंजेक्शनची निर्मिती केली जात होती. त्यानंतर मात्र केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांच्या प्रयत्नातून वर्धा येथील जेनिटीक लाईफ सायन्स या कंपनीला एम्फोटेरिसिन बी इमल्शन या इंजेक्शनच्या निर्मितीची परवानगी मिळाली होती.
या कंपनीने आज नितीन गडकरी यांच्या वाढदिवसाचे औचित्यसाधून एम्फोटेरिसिन बी इमल्शन या इंजेक्शनच्या निर्मिती प्रक्रियेला आजपासून प्रारंभ केला आहे. वर्धा येथील जेनेटिक लाईफ सायन्स कंपनीत तयार झाले असून सोमवारपासून या इंजेक्शनच्या वितरण सुरू होणार, अशी माहिती उपलब्ध झाली आहे. सर्वात महत्वाचे म्हणजे नितीन गडकरी यांच्या गतिशील प्रयत्नातूनच काही दिवसांपूर्वी जेनेटिक लाईफ सायन्स कंपनीत रेमडेसिवीर या इंजेक्शनची निर्मिती रेकॉर्ड वेळेत सुरू झाली होती.