नागपूर - सर्वत्र बाप्पाला निरोप दिला जात आहे. नागपुरातही बाप्पाच्या विसर्जनाला सुरुवात झाली आहे. नागपुरातील फुटाळा तलावावर कृत्रिम टँकमध्ये बाप्पाचे विसर्जन केल्या जात आहे. विशेष म्हणजे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व नियमांचे पालन करत शांततेत विसर्जन पार पडत आहे.
सकाळपासूनच बाप्पाला सर्वत्र निरोप दिल्या जात आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विसर्जनावेळी सर्व खबरदारी घेत विसर्जन केल्या जात आहे. नागपुरातील फुटाळा तलावावरही फक्त कृत्रिम टँकमधे विसर्जन पार पडत आहे. सोशल डिस्टन्सींग व शासनाच्या सर्व नियमांचे पालन करत नागरिक बाप्पाला निरोप देत असल्याचे पाहायला मिळत आहे. याठिकाणी १० ते १५ कृत्रिम टँकची व्यवस्था करण्यात आली आहे.
सार्वजनिक गणेश विसर्जनाला फुटाळ्यावर यंदा बंदी आहे. त्यामुळे सर्व ठिकाणी बॅरिकेट्स लावण्यात आले आहे. त्याचबरोबर पोलिसांचा चोख बंदोबस्त आहे. शिवाय पोलिसांकडून नागरिकांना सोशल डिस्टन्सींगचे नियम पाळा, असे आवाहनही केल्या जात आहे. असे असले, तरी फुटाळ्यावर दरवर्षी मोठ्या जल्लोषात बाप्पाला निरोप दिला जातो. परंतु, यंदा कोरोनामुळे अत्यंत साधेपणाने व शांततेत बाप्पाचे विसर्जन केल्या जात आहे. शिवाय तलावावर गर्दी होणार नाही, यासाठी पोलीस व प्रशासनाकडून वेळोवेळी खबरदारी घेतल्या जात आहे. त्यामुळे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विसर्जनाला उत्साह नसल्याचे दिसून येत आहे.