नागपूर - फ्रान्सचे राजदूत इमॅन्युएल लेना यांच्या नेतृत्वाखाली फ्रान्सच्या एका उच्चपदस्थ शिष्टमंडळाने आज महा मेट्रोच्या नागपूर मेट्रो रेल प्रकल्पाला भेट दिली. नागपूर मेट्रो रेल्वे प्रकल्पाच्या कार्याची माहिती घेण्याकरिता हे शिष्टमंडळ नागपुरात आज आले होते.
शिष्टमंडळातील इतर सदस्य ओलिविया बेल्मेर (सल्लागार), सोनिया बार्बरी (कॉन्सेल जनरल), जॅकी एम्प्रु, (प्रादेशिक संचालक-दक्षिण आशिया) आणि ब्रुनो बोल, (संचालक-कंट्री) हे देखील यावेळी उपस्थित होते.
अनुभव केंद्र आणि बॅकअप ऑपरेशनल कंट्रोल सेंटरला भेट-
महा मेट्रोचे प्रशासकीय कार्यालय मेट्रो भवन मधील अनुभव केंद्र आणि बॅकअप ऑपरेशनल कंट्रोल सेंटरला (बीओसीसी) या फ्रेंच शिष्टमंडळाने भेट दिली. महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. ब्रिजेश दीक्षित यावेळी उपस्थित होते. या नंतर संपूर्ण चमूने हिंगणा मार्गावरील लिटल वूडला भेट दिली. तसेच लिटिल वुड येथे महा मेट्रोच्या वतीने तयार करण्यात आलेल्या सेफ्टी पार्कची पाहणी केली.
तसेच लिटिल वुड ते वासूदेव नगर मेट्रो स्टेशन पर्यंत महा मेट्रोच्या फिडर सेवा ई-रिक्षाने प्रवास केला. त्यानंतर संपूर्ण शिष्टमंडळाने ऍक्वा लाईन मार्गिकेवरील वासुदेव नगर ते सिताबर्डी इंटरचेंज मेट्रो स्टेशन पर्यंत मेट्रोने इतर प्रवाश्यांसोबत प्रवास केला.
नागपूर मेट्रोचे कार्य अतुलनीय- फ्रान्स राजदूत
फ्रान्स राजदूत म्हणाले, शहराच्या अंतर्गत असलेल्या दळण-वळणा संबंधी मेट्रोसह आज नागपुरातील काही प्रकल्पांना भेट दिली. नागपुरातील मेट्रोचे काम बघून मी प्रभावित झालो. मेट्रो चमू -ने चांगले कार्य नागपूर शहरात केले आहे. तसेच शहरामध्ये चांगली वाहतूक सेवा उपलब्ध करून दिली आहे. महत्वाचे म्हणजे पर्यावरण संवर्धनाकरीता सोलर पॅनल सारखे उपकरण मेट्रो स्टेशन येथे स्थापित केले आहेत. जे पर्यावरणाच्या संबंधीचा उत्तम नमुना आहे. महा मेट्रोने मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण देखील केले आहे. नागपूर माझ्या देशाकरीता अतिशय महत्वाचे आहे. मेट्रो मुळे शहराच्या विकासात निश्चितच भर पडत आहे.