नागपूर - एक दिवसाच्या शांततेनंतर आज सकाळच्या सत्रात नागपुरात पुन्हा सहा जणांना कोरोनाची लागण झाल्याचा अहवाल पुढे आला आहे. त्यामुळे नागपुरातील एकूण रुग्णसंख्या 380 वर गेली आहे. मंगळवारी दिवसभरात केवळ एकच रुग्ण पुढे आला होता. सध्या नागपुरात ८२ अॅक्टिव्ह रुग्ण असून त्यांच्यावर मेयो आणि मेडिकल रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
राज्याची उपराजधानी असलेल्या नागपूरने कोरोनावर बऱ्यापैकी नियंत्रण मिळावले आहे. एकूण ३८० रुग्णांपैकी तब्बल २९१ रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात करून दाखवली आहे. म्हणूनच राज्य सरकारने नागपूरला रेड झोनमधून वगळले आहे.
तीन दिवसापासून तीन मृत्यू झाल्याने नागपुरात कोरोनाचे हॉटस्पॉट अजूनही अॅक्टिव्ह आहेत. त्या हॉटस्पॉटमधील रुग्णांवर उपचार सुरू आहेत. राज्य सरकारने कोरोनाबाबत नवी नियमावली जाहीर केली असली, तरी नागपुरात पूर्वीच्याच नियमांचे पालन होणार असल्याचे नागपूर महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी आधीच स्पष्ट केले आहे.