नागपूर - मेळघाटातील हरिसाल येथील वन अधिकारी दिपाली चव्हाण आत्महत्या प्रकरणातील आरोपी आणि मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचे निलंबित क्षेत्र संचालक श्रीनिवास रेड्डी याला अखेर नागपुरातून अटक करण्यात आली आहे. अमरावती ग्रामीण पोलिसांनी नागपूर गुन्हे शाखेच्या मदतीने बुधवारी रात्री उशिरा ही कारवाई केली.
रेड्डीला घेऊन पोलीस अमरावतीला रवाना
दीपाली चव्हाण आत्महत्या प्रकरणात गुन्हा दाखल झाल्यापासून रेड्डी अटक टाळण्यासाठी लपून छपून फिरत होता. बुधवारी दुपारपासून त्याचे लोकेशन नागपुरात दिसत असल्यामुळे अमरावती ग्रामीण पोलिसांचे पथक नागपुरात दाखल झाले. नागपूर गुन्हे शाखा तसेच स्थानिक सायबर सेलच्या मदतीने रेड्डीची शोधाशोध सुरू केल्यानंतर तो एका हॉटेलजवळ दिसून येताच पोलिसांनी त्याला अटक केली. नागपूर पोलिसांनी कागदोपत्री कारवाई पूर्ण केल्यानंतर अमरावती ग्रामीण पोलिसांचे पथक रेड्डीला अमरावतीला घेऊन गेले आहे.
रेड्डीवर महिनाभर आधीच निलंबनाची कारवाई-
दीपाली चव्हाण यांनी मेळघाट व्याघ्र प्रकल्पातील हरिसाल येथे वनपरिक्षेत्रात कार्यरत असताना वरिष्ठांच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केली होती. त्याआधी त्यांनी ६ पाणी सुसाईड नोट लिहून ठेवली होती. ज्यामध्ये आत्महत्यासाठी डीएफओ विनोद शिवकुमार यांना जबाबदार धरले होत, त्यानंतर विनोद शिवकुमारवर निलंबनाची कारवाई करण्यात आली होती.
या शिवाय मुख्य वनसंरक्षक श्रीनिवास रेड्डी यांच्याकडे अनेकवेळा तक्रार केल्यानंतर सुद्धा त्यांनी कोणतीही कारवाई न केल्याने राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रेड्डीवर सुद्धा निलंबनाची कारवाई केली होती. तेव्हापासून अटक टाळण्यासाठी तो प्रयत्न करत होता. अखेर त्याला जेरबंद करण्यात पोलिसांना यश आले आहे.