नागपूर - उपराजधानी नागपूरात सध्या बिबट्याची दहशत दिवसागणिक वाढताना दिसत आहे. सर्वात आधी गेल्या शुक्रवारी बिबट हा गायत्री नगर परिसरात सर्वात दिसला होता. तेव्हापासून वन विभाग हा बिबट्याच्या मागावर आहे. मात्र, दर दिवसाला हा बिबट लोकेशन बदलत असल्याने वन विभागाला अद्यापही बिबट्याला जेरबंद करण्यात यश आलेले नाही.
बिबट्याचे लोकेशन महाराज बागमागील नाल्याच्या परिसरात असल्याने वनविभागाकडून आज त्याच परिसरात पिंजरे आणि कॅमेरे बसवण्यात आले आहेत. काल या ठिकाणी बिबट्याने डुकराची शिकार केली होती. त्याच ठिकाणी एक पिंजरा बसवण्यात आला आहे. पिंजऱ्यासमोर असलेल्या एका झाडावर कॅमेरादेखील लावण्यात आलेला आहे. महत्त्वाचे म्हणजे बिबट्याने काल ज्या डुकराची शिकार केली होती त्यात डुकराचे मास त्या पिंजऱ्यात ठेवण्यात आले आहे. बिबट्याला सुरक्षितरित्या जेरबंद करून त्याच्या मूळ अधिवासात त्याची सुटका करण्यात येईल, अशी माहिती वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी दिलेली आहे. ज्या ठिकाणी वनविभागाने पिंजरे बसवले आहेत, त्याठिकाणी जाऊन ईटीव्ही भारतच्या प्रतिनिधीने परिस्थितीचा आढावा घेतला आहे.
हेही वाचा-गेल्या चाळीस वर्षातील सर्वात अंधकारमय वर्ष...घसरलेल्या जीडीपीवरून पी. चिदंबरम यांची टीका
बिबट्याला मूळ अधिवासात सुरक्षितरित्या जाता यावे याकरिता प्रयत्न
गेल्या चार दिवसापासून नागपूरच्या विविध भागांमध्ये बिबट्याचा वावर दिसून येत आहे. यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. बिबट्या महाराजबाग शेजारी असलेल्या नाल्यावरील फुलावर बसलेला आढळल्यापासून वन विभागाच्या पथकाने महाराजबाग परिसरातवर आपले लक्ष केंद्रित केले आहे. त्यातच आज सकाळी बिबट्याने डुकराची शिकार केल्याचं निष्पन्न झाल्याने वन विभागाचे कर्मचारी अलर्ट मोडवर आले आहेत. महाराज बाग शेजारच्या सर्व परिसरांमध्ये आज बिबट्याला पकडण्यासाठी पिंजरे लावण्यात येणार असल्याची माहिती सहाय्यक वनसंरक्षक सुरेंद्र काळे यांनी दिली आहे. बिबट्याला त्याच्या मूळ अधिवासात सुरक्षितरित्या जाता यावे याकरितादेखील प्रयत्न सुरू असल्याचे ते म्हणाले आहेत.
हेही वाचा-मराठा आरक्षणासाठी युवकाचा आत्मदहणाचा प्रयत्न
नाल्याच्या काठाने बिबट्याचा प्रवास
पहिल्यांदा बिबट हा गायत्री नगर परिसरात दिसून आला होता. त्या ठिकाणी दोन दिवस शोध घेतल्यानंतर कालपासून लोकेशन हे महाराज बाग प्राणीसंग्रालय यामागील नाल्याच्या परिसरात असल्याचं दिसून येत आहे. हा नाला पुढे नाग नदीला जाऊन मिळतो. त्यामुळे हा नाग नदीचाच भाग असल्याचा भाग म्हणून ओळखला जातो. गायत्री नगर ते महाराजबाग पर्यंत बिबट नाल्याच्या काठाने प्रवास करत आला असावा, असा कयास वनविभागाने लावलेला आहे. मात्र पुढे हा नाला नाग नदीला जाऊन मिळतो. पुढे ही नाग नदी दाट नागरी वस्ती असलेल्या भागातून जातो. त्यामुळे भविष्यात या बिबट मुळे मोठा धोका निर्माण होऊ शकतो, अशी शक्यता देखील नाकारता येत नाही. या नदी आणि नाल्याचे क्षेत्रफळ सुमारे २० ते २५ किलोमीटरचे आहे. त्यामुळे या बिबट्याला त्याच ठिकाणी रोखून त्याला जेरबंद करण्याचा प्रयत्न वनविभागाकडून केला जात आहे.