नागपूर - नागपूरचे प्राध्यापक विजय बारसे (Vijay Barse) यांच्या जीवनावर आधारित झुंड चित्रपट (Jhund) आज सिनेमागृहात प्रदर्शित झाला. महानायक अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांनी विजय बारसे यांची भूमिका साकारली आहे. प्राध्यापक विजय बारसे आणि मित्र परिवारासाठी आज 'विशेष शो'चे आयोजन करण्यात आले होते. यावेळी बारसे यांच्यासह त्यांच्या अनेक विद्यार्थ्यांनी चित्रपट बघण्यासाठी गर्दी केली होती. विजय बारसे यांचे सिनेमागृहात येताना भव्य स्वागत करण्यात आले. तसेच चित्रपट बघितल्यानंतर बारसे यांनी समाधान व्यक्त केले आहे.
नागराज मंजुळे यांनी केले झुंड चित्रपटाचे दिग्दर्शन -
नागराज मंजुळे यांनी झुंड चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. विजय बारसे हे गेल्या 20 वर्षापासून अशा मुलांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न करत आहेत, ज्यांचा गुन्हेगारी जगताशी जवळून संबंध आला आहे. भविष्यात मोठे गुन्हेगार व्हायचे असे ठरवून गुन्हेगार झालेल्या मुलांच्या जीवनात बदल घडवण्यासाठी बारसे यांनी फुटबॉल खेळाच्या माध्यमातून परिवर्तन घडवण्यास सुरुवात केली. आज त्यांनी केलेल्या प्रयत्नांमुळे शेकडो गुन्हेगार राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय खेळाडू म्हणून नावलौकिक मिळवला आहे. प्राध्यापक बारसे यांनी केलेला संघर्ष नागराज मंजुळे यांनी मोठ्या पडद्यावर आणला आहे. चित्रपट बघितल्यानंतर त्यांनी समाधान व्यक्त केले आहे.
प्राध्यापक बारसे यांचे अनेक खेळाडू आंतरराष्ट्रीय स्तरावर चमकले:-
समाजातील वंचित घटकातील मुलांचे आयुष्य प्रकाशमय व्हावे यासाठी प्राध्यापक विजय बारसे यांनी अनेक सामाजिक संस्थांच्या माध्यमातून स्लॅम शॉकर नावाची स्पर्धा सुरू केली होती, ज्यामध्ये झोपडपट्टीत राहणारे शेकडो मुलं सहभागी होतात. बारसे यांच्या प्रयत्नाने आज 250 पेक्षा जास्त खेळाडू आंतरराष्ट्रीय स्तरावर चमकले आहेत.
वंचित मुलांना आणले मुख्य प्रवाहात
विजय बारसे हे नागपूरच्या हिसलॉप कॉलेजमध्ये क्रीडा प्रशिक्षक म्हणून कार्यरत होते. याच कॉलेजपासून काही अंतरावर असलेल्या वसंतराव नाईक झोपडपट्टीमधील मुले बकेटला लाथा मारून फुटबॉल खेळताना दिसले. सन 2000 मध्ये हा प्रसंग घडला. त्यामधून झोपडपट्टी फुटबॉल म्हणजे स्लम फुटबॉल या संकल्पनेला उगम झाला. विजय बारसे यांना पुढील आयुष्य जगण्याचे ध्येय मिळाले. झोपडपट्टीतील मुले सकाळी चोऱ्या, दारू व गुन्हेगारी जगात गुंतलेले होते. त्या मुलांची ताकद फुटबॉलच्या मैदानावर पोहोचेल, तेव्हा मात्र जगाससमोर फुटबॉलचे चांगले खेळाडू घडतील, असा बारसे यांना विश्वास होता. हेच ओळखून त्यांनी वंचित मुलाना मुख्य प्रवाहात आणण्याचे काम सुरू केले.
जगभरात पोहचले स्लम सॉकरचे संस्थापक विजय बारसे यांचे नाव
विजय बारसे यांच्या स्लम सॉकर या एनजीओचे काम केवळ भारतापुरतेच मर्यादित राहिले नाही. तर भारतात सुरू झालेली ही संकल्पना इतर देशांमध्येसुद्धा रुजली आहे. यासाठीसुद्धा विजय बारसे यांनी मोठे योगदान दिले आहे. गुन्हेगारी क्षेत्रात आयुष्याचे नुकसान करू पाहणाऱ्या मुलांना त्यांनी फुटबॉलमध्ये खेळाडू म्हणून घडविले. मुलांमधील ताकद आणि जिद्द या नकारात्मक ठिकाणी जाण्यापेक्षा योग्य ठिकाणी ही उर्जा त्यांनी गुंतविली. त्यांचे काम इतर देशात अशाच पद्धतीने सुरू झाले आहे. विजय बारसे यांच्यामुळे स्लम सॉकरचे जाळे जगभरात पसरत गेले. स्लम सॉकरचे काम सुमारे 145 देशांमध्ये सुरू आहे. त्यामधून शेकडो खेळाडूंना खेळाच्या मैदानावर आणले आहे. या प्रवासाच्या यशामुळे चित्रपटाची निर्मिती होत आहे. महानायक अमिताभ बच्चन यांनी विजय बोरसे यांची भूमिका स्वीकारत त्यांच्या कामाला न्याय दिला आहे. तसेच जगभरात क्रीडाप्रसाराचे काम चित्रपटातून होणार आहे.
झोपडपट्टी ते स्लम सॉकर... मुलगा अभिजितचा सिंहाचा वाटा...
झोपडपट्टी फुटबॉलला स्लम सॉकरपर्यंत नेण्याच्या प्रवासाचे सर्वाधिक श्रेय विजय बारसे हे मुलगा अभिजितला देतात. कधीकाळी वडिलांच्या कामाला नाकारून विदेशात निघून गेलेल्या मुलाने दुःख दिले होते. मात्र, वडिलांच्या कामाची किंमत कळल्यावर अभिजित बारसे भारतात परतले. वडिलांच्या कामाचे महत्त्व पटल्यावर अभिजित बारसे यांनी स्वतःला वाहून घेतले. तो क्षण आनंदाचा असल्याचे आणि अविस्मरणीय असल्याचे विजय बारसे सांगतात. चित्रपटात हा क्षण सुंदर पद्धतीने साकारला असल्याचे सांगतात. एकंदर या चित्रपटात विजय बारसे यांच्या जीवनाबद्दल साकारलेले सगळे क्षण त्यांच्या जीवनातील सत्य घटनेवर आधारित आहेत. या चित्रपटात मांडलेल्या भूमिकेपासून ते पूर्णतः समाधानी आहेत. खरेतर विजय बारसे हे काय आहे हे समजून घ्यायचे असेल तर हा चित्रपट नक्कीच प्रत्येकांनी पाहिला पाहिजे. चित्रपटावरी मनोरंजन कर रद्द करावा, अशी विनंती विजय बारसे यांनी सरकारला केली आहे. त्यामुळे जास्तीत जास्त प्रेक्षकांना प्रेरणादायी प्रवास कळू शकले, असा विजय बारसे यांनी विश्वास आहे.